कोलवाळ कारागृहातील कर्मचाऱ्यांत असंतोष

Dissatisfaction among the staff of Colvale Jail
Dissatisfaction among the staff of Colvale Jail

म्हापसा : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात पुरेशा संख्येने मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने काही कर्मचाऱ्यांना हक्काची सुट्टी न घेता अतिरिक्त ड्युटी बजावावी लागत आहे. विशेषत: हवालदारपदी असलेल्या हेड गार्डंना ही अतिरिक्त ड्युटी करावी लागत आहे.  

कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे सेवेच्या या अतिरिक्त बोजासह हेड गार्डना मानसिक तणावाखाली सेवा बजवावी लागत आहे. तुरुंग प्रशासनाने हेड गार्ड कर्मचाऱ्यांच्या या अपुऱ्या संख्येवर तोडगा न काढल्यास मानवाधिकार आयोगाकडे दाद मागण्याची तयारी काही कर्मचाऱ्यांनी चालविली आहे.

या कारागृहात असलेल्या पंधरा हेड गार्ड कर्मचाऱ्यांपैकी. एका कर्मचाऱ्याला हल्लीच निलंबित करण्यात आले आहे. तसेच, अलीकडेच एक कर्मचारी सेवानिवृत झाला आहे. अन्य एक कर्मचारी सेवेवर रूजू झाल्यापासून तुरुंग महानिरीक्षकांच्या कार्यालयात सेवा बजावीत आहे. तसेच, एक कर्मचारी गेल्या चतुर्थीपासून कामावर गैरहजर आहे. नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार असलेला एक हेड गार्ड आजारपणाचे कारण पुढे करून रजेवर आहे. त्यामुळे या कारागृहात सध्या केवळ दहा हवालदारच कार्यरत आहेत.

हेड गार्ड कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येच्या समस्येवर तोडगा न काढता अधिकारीवर्ग केवळ स्वहितातच मग्न असून, ते मौजमजा करीत असल्याची निम्नस्तरीय तेथील कर्मचाऱ्यांची भावना झालेली आहे. अधिकारीवर्गाच्या अशा स्वरूपाच्या दुर्लक्षामुळे हेड गार्ड सध्या तणावाखाली सेवा बजावीत आहेत.

तुरूंग प्रशासनाच्या नियमानुसार या कारागृहातील विविध विभागांवार प्रतिदिन सात हेड गार्ड व सात सहाय्यक जेलर तसेच दोन जेलर कार्यरत असणे बंधनकारक आहे. या कारागृहात सध्या कैदींचे एनडीपीएस, कन्विक्टेड, अंडर ट्राइल, कोविड १९, क्वारंटाइन, पनीशमेंट व ब्लॉक नंबर फोर असे सात विभाग आहेत. परंतु, कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी विद्यमान समस्येसंदर्भात तोडगा काढताना या कारागृहातील सात विभागांची विभागणी चार ब्लॉकमध्ये केली आहे. या चार ब्लॉकवर दर दिवशी चार हवालदारांची नियुक्ती केली जात आहे व त्यांना रात्रपाळीसह सलगपणे चोवीस तास सेवा बजावावी लागते. त्या मोबदल्यात संबंधित कर्मचाऱ्यांना सलग दोन दिवस सुट्टी दिली जाते.

यदाकदाचित एखादा हवालदार सेवास्थळी किंवा घरी आजारी पडल्यास त्या कर्मचाऱ्याच्या जागी बदली कर्मचारी उपलब्धच नसतो. अशा गंभीर प्रसंगी अधिकारीवर्ग स्वत:वरील जबाबदारी झटकून तिथे सेवा बजावणाऱ्या हवालदारांनाच परीस्थितीशी जुळवून घेण्याची सूचना करतात. या ठिकाणी सध्या चार विभाग असल्याने तीन दिवसांसाठी किमान बारा हवालदारांची आवश्यकता असते; परंतु, या कारागृहात केवळ दहा हवालदार असल्याने या हवालदारांना त्यांची हक्काची सुट्टी घेता येत नाही. या कर्मचाऱ्यांना नाइलाजाने एका दिवसानंतर सेवेवर हजर रहावे लागत आहे.

कैद्यांना दवाखान्यात उपचारार्थ नेणे, महिला विभागासह कैद्यांना जेवण पुरविणे, वॉटर पंप चालू करणे तसेच अन्य सेवांचे काम कर्मचाऱ्यांना पाहावे लागते. हल्ली दररोज रात्रीच्या वेळी कारागृहातील वीज खंडित होतो. विजेअभावी कैदी अधिकच गोंधळ घालतात. त्यांना शांत करण्याची जबाबदारीही हवालदारांनाच पेलावी लागते. विभागातून कैदी बाहेर येणार नाही, याबाबत दक्षता ठेवण्याची जबाबदारीही सहाय्यक तुरुंगाधिकाऱ्यांनी हेड गार्डवरच सोपविली आहे. चारपैकी दर दिवशी फक्त दोनच साहाय्यक जेलर, तर दोनपैकी फक्त एकच जेलर सेवा बजावतात. त्यामुळे साहाय्यक जेलर तीन ते चार दिवसांनी, तर जेलर पाच ते सहा दिवसांनी एका दिवशी सेवा बजावतात, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

तुरुंग प्रशासनाकडून हेड गार्डची भरती केली जात नाही. कारागृहातील दहापेक्षा जास्त जेल गार्ड हेड गार्डपदीच्या बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची ‘बेजिक’ झालेली आहे. तथापि, प्रभारी हेड गार्ड म्हणून नियुक्ती करण्याची या कर्मचाऱ्यांची विनंती अधिकारीवर्गाने फेटाळली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com