हरमल येथील पोलिस आऊट पोस्ट अडगळीत

प्रतिनिधी
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

 नागरिकांना जावे लागते पायवाटेने : सरकार‍च्‍या दुर्लक्षाबद्दल नाराजी

हरमल: हरमल येथील किनारी भागातील खालचावाडा येथे कार्यरत असलेल्या पोलिस आऊट पोस्ट अडगळीच्या ठिकाणी आहे. गेली कित्येक वर्षे हे आऊट पोस्ट योग्य रस्त्याअभावी अडगळीत पडले आहे. त्‍याबद्दल स्‍थानिकांकडून नाराजी व्‍यक्त करण्‍यात येत आहे.

हरमल पोलिस आऊट पोस्टचे स्थलांतर गिरकर वाड्यावरील बंद असलेल्या प्राथमिक शाळा इमारतीत करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्‍याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मांद्रे मतदारसंघातील सात गावे त्यांचा पर्यटनस्थळांत समावेश होतो, त्‍या आऊटपोस्टकडे शासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याची भावना नागरिकांची बनली आहे. त्यासाठी लवकरच याबाबत पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती सरपंच मनीषा नाईक कोरकणकर यांनी दिली.

साधारण १५ वर्षांपूर्वी हे आऊट पोस्ट श्रीपाद पै यांच्या इमारतीतून मुलांअभावी बंद पडलेल्या खालचावाडा सरकारी प्राथमिक शाळेत नेण्यात आले. त्याकाळी रस्त्याची समस्या होतीच. पायवाट सुद्धा तितकी धोक्याची नव्हती. त्या इमारतीचा वापर पंचायत, जिल्हा पंचायत, विधानसभा व लोकसभा मतदान केंद्र म्हणून होत असे. कालांतराने स्थानिक भाटकारांनी स्वतःच्या जमिनी विकसित केल्या व परिणामी पायवाट अरुंद बनली व सध्या ती धोकादायक ठरत असल्याचे मत पंच सदस्य इनासियो डिसोझा यांनी सांगितले. पंचायत स्तरावर अनेकदा ठराव, निवेदने दिली. मात्र, संबंधित खात्याने अकार्यक्षमता दाखविल्‍याचे डिसोझा यांनी सांगितले.

सध्या आऊट पोस्ट इमारत, अंदाजे १०० मीटर मुख्य रस्त्यापासून आत आहे. सध्या आऊट पोस्टकडे जाण्यास आठ दहा मीटर लांब, एक-सव्वा मीटर रुंद पायवाट सुस्थितीत तर बाकी पायवाट ही खड्डेमय व चिखलमाती तुडवीत जावे लागते. पूर्वी ह्या इमारतीत मतदान केंद्र असायचे, तेव्हा मुख्यमंत्री, मंत्री व आयुषमंत्री निवडून आले होते. त्या प्रत्येकजणांनी निवडणूक काळात मतदान केंद्राला भेट दिली होती. राज्याच्या राजकारणात उच्चपद भूषविलेल्या लोकप्रतिनिधींचा, कायदा सुव्यवस्था व सामान्यांचे रक्षण करणाऱ्या यंत्रणाना संरक्षण न देणे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष कारणीभूत आहेत.गोवा निवडणूक आयोगाने,आऊट पोस्टमधील मतदान केंद्रात अपुऱ्या सोयीसुविधा असल्याने,सदरचे मतदान केंद्र माऊंट कार्मेल हायस्कूलमध्ये हलविल्याचे समजते.

मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा जीटीडीसीचे चेअरमन दयानंद सोपटे यांनी याप्रकरणी लक्ष घालून रस्ता उपलब्ध करावा व पर्यटन हंगामापूर्वी समस्या निकालात काढावी, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.

संबंधित बातम्या