सत्तरीत नैसर्गिक मधुमक्षिका पालनाची मोठी संधी

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

सत्तरी तालुका शेती, बागायतींचे अधिस्तान बनलेले आहे. केळी, नारळ, सुपारी, मिरी, जायफळ, काजू, फणस, आंबा, भात, ऊस अशा विविध पिकांनी सत्तरी तालुक्यात बहर नेहमीच धरलेला दिसून येतो. पण, आता या मुख्य पिकांबरोबरच येथील लोक जोड व्यवसाशी बांधले जात आहेत. अशाच एक प्रयोग म्हणून शेती, बागायतीला बळकटी व चालना. 

वाळपई: सत्तरी तालुका शेती, बागायतींचे अधिस्तान बनलेले आहे. केळी, नारळ, सुपारी, मिरी, जायफळ, काजू, फणस, आंबा, भात, ऊस अशा विविध पिकांनी सत्तरी तालुक्यात बहर नेहमीच धरलेला दिसून येतो. पण, आता या मुख्य पिकांबरोबरच येथील लोक जोड व्यवसाशी बांधले जात आहेत. अशाच एक प्रयोग म्हणून शेती, बागायतीला बळकटी व चालना. 

 

गोवा सरकारच्या शेतकी विभागाच्या ‘आत्मा’ प्रकल्पाअंतर्गत अनेकांना सत्तरीत मधपेटी वितरीत केली आहे. त्यामुळे सत्तरीत मधमाशी पालनाला चालना मिळत आहे. केवळ मध उत्पादन असे न पहाता त्यातून परागी भवनाला होणारा फायदा लाख मोलाचा ठरणारा आहे. मधमाशी पालन हा शेतीवर आधारित एक उपक्रम आहे. शेतकरी अतिरीक्त उत्पन्न मिळवण्यासाठी हा उद्योग करु शकतात. मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रुपांतरण करतात आणि त्यांना पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. जंगलांमधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. मध आणि त्यापासून बनवलेल्या उत्पादनांची बाजारपेठेतील मागणी वाढत असल्याने मधमाशी पालनाचा उद्योग एक टिकाऊ उद्योग म्हणून सत्तरीत उदयास येत आहे. 

सत्तरी तालुक्यातील नैसर्गिक वातावरण हे मधुमक्षिका पालन करण्यासाठी प्रोत्साहित करणारे आहे .यामुळे येणाऱ्या काळात सत्तरी तालुक्यात मधुमक्षिकापालन व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्धार वाळपई विभागीय कृषी कार्यालयाने केलेला आहे. या संदर्भाच्या कार्यशाळा कोपार्डे गावात संपन्न झाली. यावेळी मधुमक्षिका पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांना मेलविन यांनी मधुमक्षिका पालन करण्यासंदर्भात येणारी काळजी व एकूण व्यवसाय संदर्भात सविस्तरपणे माहिती दिली. वाळपई कृषी विभागीय कार्यालयाचे कृषी अधिकारी विश्वनाथ गावस, सहाय्यक अधिकारी रणजीत म्हापसेकर, उदय सावंत आदींची उपस्थिती होती. शेतकी विभागाच्या आत्मा योजने अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

विश्वनाथ गावस म्हणाले, सत्तरी तालुक्यात आतापर्यंत पन्नास जणांना मधुमक्षिका पालन मधपेटी वितरीत करण्यात आलेल्या आहेत. गेल्या एक वर्षात जवळपास तीस किलो मध निर्मिती झालेली आहे. मधुमक्षिका पालन करण्यासंदर्भात समोरील येणाऱ्या अडचणी या संदर्भात उपाययोजना व निर्माण होणाऱ्या समस्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळेचे वारंवारपणे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अधिकारी मेलविन यांनी मधुमक्षिका पालन करताना घ्यावयाची काळजी या संदर्भात सुंदर मार्गदर्शन केले. गोवा महाराष्ट्र व कर्नाटका या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मधुमक्षिकापालन करण्याचे तंत्र विकसित झालेले आहे. मात्र, गोव्यामध्ये कशाप्रकारे व कोणत्या प्रकाराचे मधुमक्षिका पालन केल्यास त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार यासंदर्भात सविस्तरपणे माहिती दिली. 

सत्तरी तालुक्यात आतापर्यंत मधुमक्षिका पालन करण्यासंदर्भात केलेल्या प्रयत्नांना बऱ्याच प्रमाणात यश आले असलेतरी सुद्धा काहीजणांना अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण झालेले आहेत. त्या संदर्भात खात्यातर्फे मदत करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. 
सहाय्यक कृषी अधिकारी रणजित म्हापसेकर यांनीही यावेळी आपले विचार मांडले. यावेळी चर्चेत मिलींद गाडगीळ, उदय सावंत, सोमनाथ गावस, भिवा गावस इतरांनी भाग घेतला. मध आणि मेण ही मधमाशी पालनातून मिळणारी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची दोन उत्पादने आहेत. शेतकी खात्याने आत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू केलेला उपक्रम अतिशय सुरेखच म्हणावा लागेल. मधमाशी पालनासाठी वेळ, रुपये आणि पायाभूत गुंतवणुकीची आवश्यकता असते. मध आणि माशांनी तयार केलेलं मेण शेतीच्या दृष्टीने फारशा मूल्यवान नसलेल्या जागेतून उत्पादित करता येते. मधमाशा स्रोतांसाठी कोणत्याही अन्य शेती उद्योगासोबत स्पर्धा करीत नाहीत. मधमाशी पालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होणारे आहेत. मधमाशा फुलोरा येणाऱ्या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे सूर्यफूल, आंबा, काजू, सुपारी, नारळ, जांभूळ, पेरू अशा विविध फळे यांसारख्या ठराविक पिकांच्या उत्पादनात वाढ होते. 

मध आणि मेण यांना  
बाजारात मोठी मागणी

मध हे एक रुचकर आणि अत्यंत पोषक अन्न आहे. मध गोळा करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे मधमाशांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट झालेल्या आहेत. त्यामुळे मधमाशांचं पेट्यांमधे संगोपन करुन आणि घरच्या घरीच मध उत्पादन घेऊन हे टाळता येते. वैयक्तिक पातळीवर सद्या सत्तरीत घरी मधमाशी पालन केले जात आहे. तसेच गटगटाने देखील मधमाशी पालन सुरू करता येते. मध आणि मेण यांच्यासाठी बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
 

संबंधित बातम्या