"आमदार व पक्ष ज्या उमेदवाराच्या मागे असतो तिथे विजय निश्‍चित होतो" गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीचा प्रचार सुरू

दैनिक गोमन्तक
रविवार, 6 डिसेंबर 2020

जिल्हा पंचायत निवडणुकीत पेडणे तालुक्यातील भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. मतदारानंतर कार्यकर्ते हा निवडणुकीतील महत्वपूर्ण घटक आहे.

पेडणे: जिल्हा पंचायत निवडणुकीत पेडणे तालुक्यातील भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील. मतदारानंतर कार्यकर्ते हा निवडणुकीतील महत्वपूर्ण घटक आहे. आमदार व पक्ष ज्या उमेदवाराच्या मागे असतो तिथे विजय निश्‍चित होतो, असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी कोरगाव येथे भाजप कार्यकर्त्यांच्या सभेत मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पेडण्यातून भाजपचे चारही उमेदवार निवडून आणा असे आवाहन केले.

कोरगाव येथील श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या या सभेला आमदार दयानंद सोपटे, गोवा भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सिद्धेश पेडणेकर, भाजप पेडणे अध्यक्ष तुळशिदास गावस, मांद्रे भाजप मंडळ अध्यक्ष मधू परब, चंद्रकांत सावळ देसाई, उमेदवार अनंत गडेकर, मतदारसंघ निरीक्षक गोरख मांद्रेकर, माजी सरपंच पंढरी आरोलकर आदी उपस्थित होते.

मंत्री आजगावकर पुढे म्हणाले, की कोरगावातील लोकांनी विकासाठी सूचना कराव्यात. कामाच्याबाबतीत राजकारण होणार नाही, पण कोरगावातील लोक माझ्यापासून दूर का राहातात हे समजत नाही.  मी तुमचा आहे. मला  दूर करू नका. कोरगावमध्ये केलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भाजप हा  मनोहर पर्रीकर या देव माणसाचा पक्ष आहे. यापुढे  भाजपमध्येच असेन याचे ठाम आश्वासन देतो. उमेदवार अनंत गडेकर जर निवडून आले नाहीत, तर हा आपला अपमान असेल. याची जाणीव ठेवून अनंत गडेकर यांना विजयी करा. तालुक्यातील जे जे प्रकल्प आणले आहेत, त्यात स्थानिकांना प्राधान्य असेल. राज्यात व केंद्रात भाजप सरकार आहे त्याचा लाभ घेऊया.

मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे म्हणाले, की भाजप अगोदर देशहित पाहत असतो. विरोधक  देशात आणि राज्यातील सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी भाजपला सर्व निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन केले. भाजप याहीपुढे जनतेसाठी योजना राबवणार आहे. त्याची कार्यवाही करण्यासाठी भाजपचे स्थानिक पातळीवरून राज्य आणि केंद्र सरकारात भाजप सरकार असणे काळाची गरज आहे. विरोधकांना मते देऊन ते सत्तेवर येऊ शकत नाहीत, अपक्षला मते देऊन मत वाया घालू नका, पैशांना बळी पडू नये, केवळ विकास आणि जनहित  पाहणाऱ्या पक्षालाच विजयी करा. विरोधक अपप्रचार करतात त्यांच्या बाजूने जाऊ नका. मोठ्या मताधिक्याने भाजपचे उमेदवार अनंत गडेकर यांना विजयी करा.

भाजप गोवा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले, की भाजपचा विजय निश्चित आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मताधिक्य वाढवण्याची गरज आहे. भाजप  देशाचे हित पाहणारा पक्ष आहे. भाजपचे कार्यकर्ते स्वाभिमानी आणि पक्षाचे हित सांभाळणारे आहेत.

भाजपा मंडळ अध्यक्ष तुळशिदास गावस यांनी पेडणे तालुक्यातील चारही जिल्हा पंचायत मतदारसंघातून भाजपचेच उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

माजी सरपंच पंढरी आरोलकर यांनी सांगितले, की परत एकदा भाजपचे सरकार आणायचे आहे. जिल्हा पंचायत निवडणूक ही भाजप सहज जिंकणार आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला संधी देऊन भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे. आपसात मतभेद विसरून काम करूया. निरीक्षक गोरख मांद्रेकर यांचेही यावेळी भाषण झाले. कोरगाव पंचायतीचा एकही पंच सदस्य यावेळी उपस्थित नव्हता.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या