'मगो'च्या दीपक ढवळीकरांविरुद्ध अविश्‍वास ; पक्षाच्या २७ सदस्यांकडून अविश्‍वास ठराव दाखल

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 डिसेंबर 2020

दीपक ढवळीकर हे बेकायदेशीररीत्या मगो पक्षाचे अध्यक्षपद भूषवित असल्याचा आरोप करून पक्षाच्या २७ सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. तसेच त्यांची पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी पक्षाच्या समितीकडे केली आहे.   

पणजी  : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या नियमावलीनुसार २०१७ मध्ये एक बैठक झाली, ती वगळता गेली सहा वर्षे सर्वसाधारण सभाच झाली नाही. त्यानंतर केंद्रीय समितीला दोन वर्षे मुदतवाढ दिली होती. तीसुद्धा २०१९ मध्ये संपली, त्यामुळे दीपक ढवळीकर हे बेकायदेशीररीत्या मगो पक्षाचे अध्यक्षपद भूषवित असल्याचा आरोप करून पक्षाच्या २७ सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. तसेच त्यांची पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी पक्षाच्या समितीकडे केली आहे.   

 

या केंद्रीय समितीने गेल्या काही वर्षांत अनेक कथित गैरप्रकार केले आहेत, त्याला विरोध करूनही बेकायदेशीर अध्यक्षपद भूषवित असलेले दीपक ढवळीकर यांनी कोणतीच पावले उचलली नाहीत. त्यांनी या पदाचा गैरवापर करून पक्षाच्या निधीचा वापर केला आहे. त्यासाठीसमितीकडून मंजुरी घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताच हक्क नाही. दरवर्षी सर्वसाधारण सभा घेण्यास ते अपयशी ठरले आहेत. त्यांनी सरचिटणीस व खजिनदारांनी तयार केलेले अहवाल सभेत मांडलेले नाहीत. त्यामुळे पक्षाचा निधीचा गैरवापर झाला असल्याचा संशय आहे. पक्षाच्या सदस्यांनी समितीसमोर ठेवलेल्या विषयावर कधीच चर्चेला घेण्यात आलेले नाहीत. राज्यात पर्रीकर सरकार स्थापन करताना मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी पाठिंबा दिला होता तेव्हा समितीला विश्‍वासात घेतले गेले नाही. भाजप सरकारला पाठिंबा देण्यासंदर्भात समितीकडून मंजुरी घेण्यात आल्याचे खोटी माहिती देण्यात आली. विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी शिरोडा मतदारसंघातून निवडणूक लढविताना केंद्रीय समितीची संमती घेतली नाही. स्वतःच अध्यक्ष असल्याने त्यांनी हा एकतर्फी निर्णय घेतला, असे या ठरावच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

ठरावावर एकाच पेनने सह्या?

मगो पक्षाला जनमानसात मोठे स्थान मिळत आहे. मगो पक्ष हा भाऊसाहेब बांदोडकरांचा पक्ष आहे, बहुजन समाजाचा कष्टकरी समाजाचा पक्ष आहे. मगो पक्षाला गोमंतकीयांच्या मनात आणि ह्रदयात स्थान आहे, मात्र काही विघ्नसंतोषी लोकांना गोंधळ माजवून पक्ष कार्यकर्ते व मतदारांत संभ्रम निर्माण करण्याची सवय असून त्याचाच हा एक भाग असल्याचे दीपक ढवळीकर म्हणाले. हे सर्व काही बोगस असून मगो पक्ष कार्यकर्ते, मगोप्रेमी व मतदारांनी त्यावर विश्‍वास ठेवू नये, असे दीपक ढवळीकर म्हणाले. या ठरावावर ज्या सह्या केल्या आहेत, त्या एकाच पेनने केल्या आहेत. अविश्‍वास ठराव आणला आहे, तर मग प्रसार माध्यमांसमोर आपला चेहरा या लोकांनी का उघड केला नाही, असा सवाल करून ज्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे, असे लोकच ही कृत्ये करीत असल्याचा आरोपही दीपक ढवळीकर यांनी केला आहे. 
 

 

 

संबंधित बातम्या