ढवळीतील दिवाळी बाजार सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

दरवर्षी  दिवाळीआधी भरणारा ढवळीतील दिवाळी बाजार सुरू झाला असून , येत्या बुधवारी ११ पर्यंत हा दिवाळी बाजार खुला राहील.​

फोंडा :  ढवळी येथील दिवाळी बाजारचे उद्‌घाटन माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते काल सकाळी करण्यात आले. ढवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मंडळाच्या सभागृहात सामाजिक उपक्रमांतर्गत या दिवाळी बाजारचे आयोजन केले असून येत्या बुधवारी ११ पर्यंत हा दिवाळी बाजार खुला राहील.

या उद्‌घाटन कार्यक्रमावेळी कवळेचे सरपंच राजेश कवळेकर, उपसरपंच मनुजा नाईक, पंच सोनाली तेंडुलकर, उषा नाईक, श्रीधरन नायर, उद्योजक देवेंद्र ढवळीकर, ढवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमोल ढवळीकर, संकेत मुळे, ऐश्‍वर्या जोशी आदी उपस्थित होते. 

सुदिन ढवळीकर यांनी ढवळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारलेल्या दिवाळी बाजार संकल्पनेचे कौतुक करून अशाप्रकारच्या उपक्रमातून स्वयसंहाय्य गट तसेच स्वरोजगार करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे नमूद केले. दिवाळीनिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. 

कवळेचे सरपंच राजेश कवळेकर यांनी ढवळीतील या बाजार संकल्पनेचे अभिनंदन करून व्यापाऱ्यांना एकाच छताखाली आणण्याची ही संकल्पना स्वरोजगार करणाऱ्यांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले व सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन वेदांगी ढवळीकर यांनी केले तर अमोल ढवळीकर यांनी आभार मानले. या दिवाळी बाजारात विविध तऱ्हेच्या जिन्नसांचे वस्तू तसेच खाद्यपदार्थ आदींचे स्टॉल लावण्यात आले असून ग्राहकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

संबंधित बातम्या