कोरोनाचे सावट..पण तरीही दिवाळीची लगबग !

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

यंदा ‘कोविड’चे सावट असले, तरी डिचोलीत सर्वत्र दिवाळी सणाची तयारी आणि लगबग सुरू असल्याचे दिसून येते. दिवाळी म्हटल्याबरोबर नरकासूर आलाच.

डिचोली :  यंदा ‘कोविड’चे सावट असले, तरी डिचोलीत सर्वत्र दिवाळी सणाची तयारी आणि लगबग सुरू असल्याचे दिसून येते. दिवाळी म्हटल्याबरोबर नरकासूर आलाच. नरकासुररुपी अनिष्ट प्रवृत्तींची राख करून सर्वत्र दिवाळी साजरी करतात. ‘कोविड’मुळे यंदा नरकासूराच्या राजवटीवर मर्यादा येणार असली, तरी गावोगावी नरकासूर उभे राहणार आहेत. दिवाळी जवळ आल्याने सध्या डिचोली शहरात विविध ठिकाणी नरकासुराच्या प्रतिमांना आकार देण्याची कामे सुरू झाली आहेत. लोखंडी सांगाड्यांबरोरच अलीकडच्या काही वर्षांपासून बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या नरकासुराच्या सांगाड्यांना मागणी असल्याने सध्या शहरात हे सांगाडेही उभे राहू लागले आहेत.

ल्या साधारण दहा वर्षांपासून महाराष्ट्रातील काही कारागिरांनी शहरात बांबूच्या बेतापासून सांगाडे बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. बांबूच्या बेतापासून बनवण्यात येणाऱ्या सांगाड्यांना मागणी असल्याने, सध्या शहरात कारागिरांकडून हे सांगाडे बनवण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. 
शहरातील मुस्लिमवाडा परिसरात वास्तव्य करणारे महाराष्ट्रातील तासगाव भागातील कारागिर सध्या बांबूच्या बेतापासून नरकासुराचे सांगाडे तयार करण्याच्या कामाकडे वळले आहेत. गेल्या काही वर्षांपासून डिचोलीत बांबूच्या बेतापासून बनवलेले सांगाडे विक्रीस उपलब्ध असतात. 
गेल्या आठ-दहा वर्षांपासून या सांगाड्यांना वाढती मागणी असल्याने या सांगाड्यांचा खपही चांगला होत आहे.  सांगली जिल्ह्यातील तासगाव भागातील डिचोलीत वास्तव्य करून असलेली माने आणि जाधव कुटूंबे या व्यवसायात आहेत. दिवाळीला साधारण महिना असताना ही कुटूंबे सांगाडे करण्याच्या कामांत लक्ष घालतात. यात पुरुषांबरोबरच महिला आणि मुलेही वावरतात. तयार सांगाड्यांना मागणी चांगली आहे. 

यंदा कोविडमुळे सांगाड्यांना मागणी घटणार असल्याचे माने कुटुंबिय म्हणाले. दोन ते दहा फूट उंचीचे सांगाडे तयार करण्यात येतात. आकाराप्रमाणे २०० ते २ हजार रुपये किमतीपर्यंतचे सांगाडे विक्रीस उपलब्ध असतात, असेही माने यांनी सांगितले. बांबू गोळा करण्यासाठी गावोगावी हिंडावे लागते. ते जाग्यावर येईपर्यंत एक बांबू साधारण दिडशे रुपयांपर्यंत पडत आहे, असेही माने या कारागिराने  सांगितले.

संबंधित बातम्या