व्होकल फॉर लोकल’ खरेदीला प्राधान्य

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

पण याशिवाय महिलांकरवी दिवाळीच्या निमित्ताने व्यवसायातही पुढाकार घेतला जात आहे. यावर्षीच्या दिवाळीला राज्यभरात ‘व्होकल फॉर लोकल’ म्हणजेच स्थानिक वस्तू आणि गोष्टींना प्राधान्य देणारी खरेदी लोकांकरवी केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. 

पणजी : दिवाळी आली की दरवर्षी खरेदीसाठीच्या लगबगीमध्ये महिला मंडळ खूप पुढे असते. यावर्षीसुद्धा महिला मंडळ दिवाळीच्या तयारीसाठी लगबग करीत आहे. यावर्षी घरातील दिवाळीच्या खरेदीमध्ये तर महिला अग्रेसर आहेतच, पण याशिवाय महिलांकरवी दिवाळीच्या निमित्ताने व्यवसायातही पुढाकार घेतला जात आहे. यावर्षीच्या दिवाळीला राज्यभरात ‘व्होकल फॉर लोकल’ म्हणजेच स्थानिक वस्तू आणि गोष्टींना प्राधान्य देणारी खरेदी लोकांकरवी केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. 

राज्यातील अनेक घरांना कोरोनामुळे आलेल्या जागतिक आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. यामुळे काही ना काही करून पैसे कमावण्यासाठीची धडपड सुरू आहे. अनेक महिलांनी यावर उपाय शोधलेला पहायला मिळत आहे. घरच्या घरी लाडू, चिवडा, चकल्या आणि दिवाळीसाठी लागणारे अनेक खाद्यपदार्थ करून विकले जात आहेत. या खाद्यपदार्थांची जाहिरात ऑनलाईन पद्धतीने केली जात असून जशी ऑर्डर मिळेल तसा माल ग्राहकाच्या घरी पोहचविला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याशिवाय कंदील, मातीचे दिवे, कपडे आणि अनेक वस्तू विकल्या जात आहेत. घरी तयार केलेले खाद्यपदार्थ आणि वस्तूंच्या बाबतीत लोकांच्या मनात विश्वासार्हता अधिक प्रमाणात असल्याने लोक या वस्तू आवडीने घेत असताना पाहायला मिळत आहेत.

यासाठी अनेक महिलांचे समूहसुद्धा कार्यरत आहेत. गो वुमनिया, शॉपिंग बॅग, व्होकल फॉर लोकल गोवा अशाप्रकारचे अनेक ग्रुप वॉट्सअॅप आणि फेसबुकवर कार्यरत आहेत यांच्या माध्यमातून ते वस्तू विकत आहेत.
अनेक महिलांकडे आकाश कंदीलसुद्धा विकण्यासाठी आहेत. यांचे दर अगदी १०० रुपयांपासून सुरू होतात ते त्यांच्या आकारापर्यंत आणि दर्जानुसार बदलतात. पणजी बाजारपेठेसह राज्यातील अनेक दुकानातही आकाशकंदील आले आहेत. जे घेण्यासाठी लोक गर्दी करताना दिसून येत आहेत. याशिवाय विजेच्या माळा आणि वेगवेगळ्या आकाराचे विद्युत दिवेसुद्धा दुकानात उपलब्ध आहेत. १० रुपयांपासून १०० रुपये दरांपर्यंत उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या आणि रांगोळ्यांचे साचे घेण्यासाठी लोक बाजारात गर्दी करताना दिसून येत आहेत. ऑनलाईन खरेदीला अधिक पसंती अनेक दुकानांमध्ये दिवाळीसाठीचे ग्राहकांसाठी कपडे आणले आहेत. मात्र, हे कपडे घेण्यासाठी दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी ग्राहक कमी आहेत. मोठ्यामोठ्या ब्रॅण्डची दालनेसुद्धा रिकामी आहेत. याउलट फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि नायकासारख्या शॉपिंग ॲपवर मोठ्या प्रमाणात सवलत मिळत आहे. शिवाय हे शॉपिंग ॲप विशिष्ट रुपयांच्या खरेदीनंतर पैसे न आकारता सामान घरी पोहचवितात. त्यामुळे जादाचे पैसेही वाचतात. शिवाय त्यांच्याकडून खरेदीसाठी वेगळी भेटवस्तूही दिली जाते. त्यामुळे लोकांचा कल ऑनलाईन खरेदीकडे अधिक असलेला पहायला मिळत आहे.

महिलांची धडपड वाखाणण्याजोगी : सिया शेख 
उद्योजिका सिया शेख यांनी राज्यातील १३०० महिलांना एकत्रित करीत गोयंकार्टसारखे ॲप राज्यात आणले आहे. या ॲपच्या माध्यमातून महिलांना चांगले ग्राहक मिळत असून त्यांच्या गाठीला चार पैसे येत आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महिलांना व्होकल फॉर लोकल ही संकल्पना मदत करीत आहे आणि दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू या माध्यमातून खरेदी करून राज्यातील इतर लोकही पुढाकार घेत असल्याचा आनंद होत असल्याचे सिया शेख म्हणाल्या.

संबंधित बातम्या