शाळा सुरू करण्याचा निर्णय घाईगडबडीत नको; शाळा व्यवस्थापन व पालकांची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

दर दिवशी सात ते आठ रुग्णांचा बळी जात आहे. अशा परिस्थितीत सरकार शाळा सुरू करण्यासाठी तयारी करत आहे. सरकारने शाळा सुरू करण्यासाठी घाईगडबडीत निर्णय घेऊ नये, अशी मागणी शाळा व्यवस्थापन व पालकवर्ग यांच्याकडून होत आहे.

नावेली: गोव्यात कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. गोव्यात कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा २४ हजारांवर पोहोचला आहे, तर सक्रिय रुग्णांचा आकडा साडेपाच हजारांवर पोहोचला आहे. दर दिवशी सात ते आठ रुग्णांचा बळी जात आहे. अशा परिस्थितीत सरकार शाळा सुरू करण्यासाठी तयारी करत आहे.

सरकारने शाळा सुरू करण्यासाठी घाईगडबडीत निर्णय घेऊ नये, अशी मागणी शाळा व्यवस्थापन व पालकवर्ग यांच्याकडून होत आहे.

कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा मडगावात वाढतच असून हा आकडा सुमारे ४०० हून अधिक आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत आणून पोहचवण्याचे व शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाण्यासाठी पालक येतात. त्यामुळे शाळेच्या आवारात सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन होणे शक्य होणार नाही.

अनेक शाळांमध्ये वर्ग खोल्या कमी असल्याने सामाजिक सुरक्षित अंतराचे पालन कसे होणार असे अनेक प्रश्न शाळा व्यवस्थापनासमोर आहेत.

त्यामुळे सरकारने शाळा सुरू करण्यासाठी घाईगडबडीत निर्णय न घेता शाळा व्यवस्थापनांना तसेच पालकांना विश्वासात घेऊन नंतरच निर्णय घ्यावा, असे आवाहन आके - मडगाव येथील टी. बी. कुन्हा शाळा व्यवस्थापनाचे सचिव अविनाश शिरोडकर यांनी केले आहे.

आपल्या जवळ अनेक पालकांनी संपर्क साधून शाळा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणींसंदर्भात चर्चा केली असून शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांना विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या