घरगुती वीज स्‍थिर आकारात ५० टक्के सवलत; वीज ग्राहकांना दिलासा

प्रतिनिधी
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

राज्यातील वीज ग्राहकांना या निर्णयामुळे १८ कोटी ३० लाख रुपये यापुढील बिलांत परत मिळणार आहेत. घरगुती वीज ग्राहकांचा स्‍थिर आकार ५० टक्के घटवण्यात आला असून उच्च दाबाच्या वीज ग्राहकांना केवळ प्रत्यक्षातील वीज वापराचेच पैसे द्यावे लागणार आहेत. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पणजी: ‘कोविड’ टाळेबंदीच्या आणि त्यानंतरच्या काळात वीज बिले भरमसाठ वाढलेली आहेत. ती कमी करावीत या होणाऱ्या मागणीला प्रतिसाद म्हणून सरकारने आज घरगुती कमी दाबाच्या वीज ग्राहकांना (घरगुती, वाणिज्यिक आणि इतर वर्गातील) स्‍थिर आकाराच्या (फिक्स्ड चार्जिस) पन्नास टक्के रक्कम एप्रिल आणि मे महिन्यासाठी माफ करण्याची घोषणा केली. त्याशिवाय उच्च दाबाच्या वीज ग्राहकांसाठी याच कालावधीतील वीज वापरासाठी मागणी शुल्क आणि प्रत्यक्षातील मागणी शुल्क यांच्यातील तफावत माफ केली जाणार आहे.

राज्य सरकारने हा निर्णय घेतला, असे स्पष्ट केले असले तरी हा निर्णय प्रत्यक्षात केंद्र सरकारने दिलेल्या सवलतींमुळे घेण्यात आला आहे. वीज मुख्य अभियंता कार्यालयातून राज्य सरकारला या निर्णयासंदर्भात माहिती देण्यासाठी टिप्‍‍पणी पाठवण्यात आली आहे. यात केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील वीज उत्पादक कंपन्यांनी सुट देण्याचे ठरवल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाने १३ कोटी २० लाख रुपयांची तर पावर ग्रीड कॉर्पोरेशनने ४ कोटी ९३ लाख मिळून एकूण १८ कोटी १३ लाख रुपयांची सुट गोव्याला देण्याचे ठरवले आहे. सरकारने ही सुट वीज ग्राहकांपर्यंत पोचवली आहे.

उच्च दाबाच्‍या ग्राहकांना लाभ

थ्रीफेज घरगुती वीज जोडणीसाठी मासिक ६८ रुपये स्‍थिर आकार आहे. त्यामुळे त्या ग्राहकाला एप्रिल व मे महिन्याचे मिळून केवळ ६८ रुपये जुलै महिन्यांच्या बिलात परताव्याच्या रुपाने मिळणार आहेत. सिंगल फेज घरगुती वीज जोडणीसाठी ३४ रुपये १७ पैसे स्‍थिर आकार आहे. तेवढीच रक्कम त्या ग्राहकाला परताव्याच्या रुपाने जुलै महिन्याच्या बिलातून परत मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाचा खरा फायदा उच्च दाबाच्या वीज ग्राहकांना होणार आहे.

म्‍हणून तफावतीवरील आकार माफ निर्णय

राज्यातील वीज ग्राहकांना या निर्णयामुळे १८ कोटी ३० लाख रुपये यापुढील बिलांत परत मिळणार आहेत. घरगुती वीज ग्राहकांचा स्‍थिर आकार ५० टक्के घटवण्यात आला असून उच्च दाबाच्या वीज ग्राहकांना केवळ प्रत्यक्षातील वीज वापराचेच पैसे द्यावे लागणार आहेत. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

संबंधित बातम्या