सामाजिक नियम मोडणाऱ्यांची गय करू नका

dainik Gomantak
मंगळवार, 7 जुलै 2020

‘कोविड - १९’ महामारीचा संसर्ग टाळण्यासाठी कायद्याची कडकपणे अंमलबजावणी करा. सामाजिक अंतर आदी नियम मोडणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करतानाच, वेळप्रसंगी त्यांची गय करू नका, असे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.

डिचोली

आज (सोमवारी) सभापती राजेश पाटणेकर आणि आमदार प्रवीण झांट्ये यांच्या उपस्थितीत डिचोलीत घेतलेल्या कोरोनाच्या सद्यस्थितीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वरील निर्देश दिले. कोरोना महामारीचे संकट टाळण्यासाठी प्रत्येकांनी आवश्‍यक ती काळजी घेतानाच, आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी करून सर्वांच्या सहकार्यातून कोरोना विरोधात व्यापक जागृतीची गरजही व्यक्त केली.
या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तालुक्‍यातील कोरोनाच्या संसर्गाविषयी आढावा घेतला. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे आदी सामाजिक नियम मोडणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई चालूच ठेवताना नियम पाळण्याबाबतीत जे कोण गंभीर नाहीत. त्यांची गय करू नका. वेळप्रसंगी त्यांना पकडून दिवसभर पोलिस ठाण्यात बसवा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले. सध्या बाजारपेठा उघड्या असल्याने रस्त्यावर आदी ठिकाणी बसून फळ-भाजी आदी वस्तू विकणाऱ्यांना अनाधिकृत विक्रेत्यांना तेथून हटवा. काही भागात झोपड्यांतून जुगार चालत असल्यास तो बंद करा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहून सावधगिरी बाळगावी. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मार्गदर्शक तत्वांविषयी अजूनही जागृती होणे आवश्‍यक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
डिचोली पोलिस स्थानकात आयोजित केलेल्या या बैठकीस डिचोलीचे नगराध्यक्ष सतीश गावकर, उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक उत्क्रीष्ट प्रसून, डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक गुरुदास गावडे, पोलिस निरीक्षक संजय दळवी, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार प्रवीणजय पंडित, डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. मेधा साळकर, मये आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. सिध्दी कासार अन्य अधिकारी, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर तसेच नगरसेवक, सरपंच आणि पंच उपस्थित होते. यावेळी डॉ. मेधा साळकर, डॉ. सिध्दी कासार, मयेचे सरपंच तुळशिदास चोडणकर, साखळीचे नगरसेवक आनंद काणेकर आदींनी उपस्थित केलेल्या शंकांचे मुख्यमंत्र्यांनी निरसन करून जनतेने धीर सोडता कामा नये, असे आवाहन केले. आमदार प्रवीण झांट्ये यांनी आढावा बैठक घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले.

संबंधित बातम्या