मोलेतील नियोजित प्रकल्पांसंबंधी दिशाभूल करू नये : दीपक पाऊसकर

वार्ताहर
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारने मोले पंचायत क्षेत्रात होऊ घातलेला वीजवाहिनी प्रकल्प तसेच राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार व कुळे रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या स्वयंसेवी संघटनांनी लोकांची विनाकारण दिशाभूल करू नये, हे प्रकल्प स्थानिकांना विश्‍वासात घेऊनच करण्यात येतील, अशी ग्वाही सावर्डे मतदारसंघाचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी दिली. 

फोंडा:  केंद्र सरकारने मोले पंचायत क्षेत्रात होऊ घातलेला वीजवाहिनी प्रकल्प तसेच राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार व कुळे रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या स्वयंसेवी संघटनांनी लोकांची विनाकारण दिशाभूल करू नये, हे प्रकल्प स्थानिकांना विश्‍वासात घेऊनच करण्यात येतील, अशी ग्वाही सावर्डे मतदारसंघाचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांनी दिली. 

पिळये - धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनानिमित्त सेवा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन आज (गुरुवारी) करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दीपक पाऊसकर बोलत होते. 

या कार्यक्रमात कोरोना काळात रुग्णांना सेवा देणारे डॉक्‍टर्स, परिचारिका इतर कर्मचारी, रुग्ण व पत्रकारांचा फळे तसेच मास्क देऊन सन्मान करण्यात आला. 
यावेळी पिळये प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. संदेश मडकईकर, साकोर्डासरपंच जीतेंद्र नाईक, दाभाळ उपसरपंच शशिकांत गावकर, पंच मोहन गावकर, सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष मच्छिंद्र देसाई व इतर उपस्थित होते. 

दीपक पाऊसकर म्हणाले, की धारबांदोडा तालुक्‍यातील मोले येथे एकाचवेळी तीन राष्ट्रीय प्रकल्प साकारले जात आहेत. 

त्यासाठी स्थानिकांना विश्‍वासात घेऊन पुढील कृती केली जाईल. या प्रकल्पांविषयी पूर्ण माहिती लोकांना देण्यासाठी येत्या शनिवारी संध्याकाळी चार वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. 

रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करताना पर्यावरणाची हानी न करता तसेच प्रसिद्ध दूधसागर धबधब्याच्या निसर्ग सौंदर्याला कोणतीच बाधा न आणता हेकाम केले जाणार आहे. सर्वांना विश्‍वासात घेऊनच ही कामे करण्यात येणार असून याप्रकरणी कोणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन दीपक पाऊसकर यांनी केले. 

खाण कंपनीत कार्यरत ट्रकवाल्यांना खनिज वाहतुकीचा दर योग्य प्रकारे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून संजीवनी साखर कारखान्याच्या शेतकऱ्यांचाही प्रश्‍न मार्गी लावला जाईल. कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांवरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाहीही दीपक पाऊसकर यांनी दिली. 

पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना महामारीच्या काळात रुग्णांना चांगली सेवा देण्यात येत असून डॉ. संदेश मडकईकर यांनी यासंबंधीची माहिती दिली.

संबंधित बातम्या