मेळावलीवासीयांनी चर्चेसाठी यावे: मुख्यमंत्री

दैनिक गोमन्तक
शनिवार, 9 जानेवारी 2021

मेळावलीतील जनतेसाठी चर्चेचे दरवाजे सदैव उघडे आहेत. त्यांनी आधी चर्चेसाठी यावे, मग त्यांच्या मागण्यांविषयी विचार करता येईल,

पणजी: मेळावलीतील जनतेसाठी चर्चेचे दरवाजे सदैव उघडे आहेत. त्यांनी आधी चर्चेसाठी यावे, मग त्यांच्या मागण्यांविषयी विचार करता येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे सांगितले.

ते म्हणाले, ते मला चर्चेसाठी बोलावत आहेत. मी तेथे गेलो, अनेकांना भेटलो. सरकारची भूमिका मी मांडली आहे. ते साखळी येथेही दोन वेळा चर्चेसाठी आले होते. आजवर तीन वेळा चर्चा झाली आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो. तेथील १७ कुटुंबांच्या जमिनींचा हा प्रश्न आहे, मात्र तो सर्व गावाला ते लागू करू पाहत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी चर्चेसाठी येतो असे दूरध्वनीवर सांगितले होते  पण ते आले नाहीत. ते येऊ नयेत यासाठी कोणीतरी प्रयत्न करत आहेत. कोणीतरी त्यांना चिथावणी देत आहेत.

लोक हिंसक झाले तरी ते गोमंतकीय आहेत. त्यांना राग अनावर झाला असावा. त्यांनी कोयत्याने एका पोलिसाच्या हातावर वार केल्याने १९ टाके घालावे लागते, झटापटीत डिचोलीचे पोलिस निरीक्षक जखमी झाले. त्यांनी डोळ्यांत मिरचीचे पाणी फेकले. दांड्याने मारहाण केली, असे  त्यांनी करणे अपेक्षित नाही. त्यांनी चर्चा करावी व मार्ग काढावा. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही मी चर्चेसाठी पाचारण केले होते. ते मला बोलवत होते. पण येथे झालेल्या चर्चेतून प्रश्न सुटला, तसा मेळावलीवासियांचाही प्रश्न सुटू शकतो, त्यासाठी त्यांनी चर्चेसाठी आले पाहिजे. त्यांनी हिंसेचा मार्ग सोडावा, ती वृत्ती बरी नव्हे.

ते म्हणाले, केंद्र सरकारने आदिवासी संशोधन केंद्र मंजूर केले आहे. सांगे येथे ते उभारले जाणार आहे. सरकारने आता कंत्राटदारांची बिले अदा करणे सुरू केले आहे. या महिन्यात गेल्या जूनपर्यंतची बिले अदा केली जाणार आहेत. यामुळे बिले प्रलंबित राहण्याचा कालावधी सहा महिन्यांवर येणार आहे. पुढे तो तिमाहीवर येईल. सरकार वित्तीय व्यवस्थापनावर विशेष लक्ष देत आहे. गेल्या काही महिन्यांत विविध प्रकल्पांची कामे केलेल्या कंत्राटदारांना बिले अदा केली आहेत.

 

संबंधित बातम्या