म्हापशात सुलभ शौचालयात दुप्पट शुल्क

प्रतिनिधी
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

म्हापसा येथील कदंब बसस्थानकाच्या उत्तर दिशेने असलेल्या सिरसाट बिल्डिंगसमोरील सुलभ शौचालयात गेल्या काही महिन्यांपासून दुप्पट दराने शुल्क आकारणी केली जात असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत.

म्हापसा: म्हापसा येथील कदंब बसस्थानकाच्या उत्तर दिशेने असलेल्या सिरसाट बिल्डिंगसमोरील सुलभ शौचालयात गेल्या काही महिन्यांपासून दुप्पट दराने शुल्क आकारणी केली जात असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. दरम्यान, म्हापसा पालिकेने यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणी म्हापशातील एक सामाजिक कार्यकर्ता शेखर नाईक यांनी केली आहे.

लघवी करण्यासाठी एक रुपया, शौचविधीसाठी दोन रुपये, तर आंघोळीसाठी पाच रुपये असे दरपत्रक त्या शौचालयात एका फलकाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले आहे. असे असले तरी प्रत्यक्षात लघवी करण्यासाठी पाच रुपये, शौचविधीसाठी दहा रुपये, तर आंघोळीसाठी वीस रुपये ग्राहकांकडून आकारले जात आहेत, अशा तक्रारी आहेत. या शौचालयाचा लाभ घेणाऱ्यांना शुल्काच्या आकारणीसंदर्भात पावत्या दिल्या तरच हा अनागोंदी कारभार नियंत्रणात राहील, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.

या शौचालयाची देखभाल पुंडलिकनगर, पर्वरी येथील सुलभ इंटरनॅशनल सोशल सविंस ऑर्गनायझेशनच्या गोवा राज्य शाखेतर्फे केली जात आहे. या शौचालयाच्या ठिकाणी असलेले कर्मचारी कदापि गणवेश परिधान करीत नाहीत. तसेच, ते ग्राहकांना शुल्कासंदर्भातील पावतीही देत नाहीत. दामदुप्पट दराने ते ग्राहकांकडून शुल्क आकारत असतात. अरेरावी करून ते ग्राहकांकडून पैसे वसूल करीत असतात, अशा तक्रारी आहेत. विशेषतः महिलांकडून ते लघवीसाठी पाच किंवा दहा रुपये आकारत असतात. त्या कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा तेवढी रक्कम दिलेली बरी, असा विचार करून त्या महिला पैसे देऊन नाइलाजाने निमूटपणे तेथून जात असतात.

दरम्यान, या शौचालयात येणाऱ्या ग्राहकांच्या बॅगा लंपास करण्यात तेथील कर्मचाऱ्यांचाच हात असल्याच्या तक्रारी आहेत. बाजारहाट केल्यानंतर भाजी अथवा मासळीने भरलेल्या बॅगा काही जण शौचालयाच्या काउंटरवर ठेवून नैसर्गिक विधीसाठी आत जात असतात. तथापि, त्या बॅगा ते कर्मचारी तिथेच असतानाही लगेच लंपास होत असतात. त्या बॅगांमध्ये असलेल्या ऐवजाची किंमत कित्येकदा पाचशे रुपयांच्या आसपास असते. अशा गैरप्रकारात खुद्द तेथील कर्मचाऱ्यांचे संबंधित चोरट्यांना सहकार्य मिळत असल्याचा दावा एक नागरिक पवन नावेलकर यांनी केला आहे. शासकीय यंत्रणेने अशा गैरकृत्यांच्या विरोधात कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे.

संबंधित बातम्या