महाराष्ट्र-गोवा मार्गावर वाहतुकीबाबत संशय

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

दोडामार्ग बाजारपेठेत सीमावर्तीय जनतेची ये-जा सुरुच

डिचोली:  गोवा आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या दोडामार्ग तपासणी नाक्‍यावर नाकाबंदी शिथिल करण्यात आली असली, तरी काही वाहने आणि प्रवाशांची चोरट्या मार्गाने गोव्यातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून गोव्यात ये-जा चालू असल्याचा संशय सीमावर्ती भागात व्यक्‍त होत आहे. तीन महिन्यापूर्वी बंद करण्यात आलेल्या आडमार्गांकडेही आता दुर्लक्ष झाल्याने चोरट्या वाहतुकीस रान मोकळे झाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त होत आहे. 

   दोडामार्ग बाजारपेठेत गोव्यातील सीमावर्ती भागातील जनतेला आता प्रवेश देण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात टाळेबंदी लागू झाल्यानंतर डिचोली आणि महाराष्ट्रातील दोडामार्गला जोडणाऱ्या तपासणी नाक्‍यावर नाकाबंदी कडक करण्यात आली. त्यामुळे  गोव्यातून राज्याबाहेर जाण्यास आणि राज्याबाहेरून गोव्यात येण्यास वाहनांबरोबर प्रवाशांवरही पूर्णपणे निर्बंध आले होते. 

सुरवातीपासूनच तपासणी नाक्‍यावर वाहने आणि प्रवाशांची कडकपणे कसून तपासणी सुरू झाली. अत्यावश्‍यक वाहनांनाच तपासणी नाक्यावरून सोडण्यात येत होते. दोडामार्ग तपासणी नाक्‍यावर वाहने आणि कागदपत्रांची कसून तपासणी करतानाच, थर्मल स्कॅनर यंत्रणेद्वारे सीमा ओलांडणाऱ्यांची तपासणीही सुरू झाली. टाळेबंदीत शिथिलता आल्यानंतर या तपासणी नाक्यावरून वाहने सोडण्यात येत असली, तरी त्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. 

दोडामार्ग बाजारपेठेत प्रवेश!
नोकरीनिमित्त महाराष्ट्रवासीय सीमा ओलांडत असले, तरी डिचोलीला जवळ असलेल्या दोडामार्ग बाजारपेठेत मात्र जवळच्या साळ, कासारपाल आदी भागातील जनतेला मात्र काही दिवसांपूर्वी बिनधास्तपणे जाता येत नव्हते. बाजारपेठेत गोव्यातील व्यक्‍ती नजरेला आलीच, तर कोरोना महामारीच्या भीतीने दोडामार्ग येथील व्यापारी बाहेरील व्यक्‍तींना समजुतीने माघारी पाठवत होते. मात्र, मागील आठवड्यापासून दोडामार्गात जाण्यास कोणतीही आडकाठी नसल्याची माहिती मिळाली आहे. साळ येथील समाजसेवक मेघश्याम राऊत यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

आडमार्गाने ये-जा !
''टाळेबंदी''लागू झाल्यानंतरही आडमार्गाने गोवा-महाराष्ट्रात रहदारी होत असल्याचे निदर्शनास येताच, मागील एप्रिल महिन्यात सरकारी यंत्रणेने प्रतिबंधात्मक पावले उचलून दोडामार्गाला जोडणारे खरपाल आदी भागातील आडमार्ग अडथळे निर्माण करून बंद केले होते. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर तर बंद करण्यात आलेले काही आडमार्ग दुर्लक्षित झाले आहेत. महाराष्ट्र राज्यात नोंदणी करण्यात आलेल्या संशयित अशा काही दुचाक्‍या आणि मोटारगाड्या डिचोली परिसरात आढळून येत आहेत. दोडामार्ग तपासणी नाक्यावरून येणाऱ्या वाहनांची तपासणी करुनच त्यांना सोडण्यात येत असले, तरी अनावश्‍यक वाहनांची रहदारी होत असल्याने ही वाहने कोठून आणि कशी येतात. त्याबाबत स्थानिक जनतेमध्ये संभ्रम आहे. 

संबंधित बातम्या