पारंपरिक पणती व्यवसायाला उतरती कळा....!

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

एकेकाळी पणत्यांसाठी प्रसिध्द असलेल्या डिचोली शहरातील कुंभारवाडा-बोर्डे येथील पारंपरिक पणती व्यवसायाला आता उतरती कळा लागली असून हा पारंपरिक व्यवसाय लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

डिचोली: दिवाळी म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे आणि असत्याकडून सत्याकडे नेणारा दिव्यांचा सण. पणत्यांची आरास हे दिवाळीचे एक खास वैशिष्ट्य. नरकासूर प्रतिमा दहन केल्यानंतर घरोघरी पणत्या प्रज्वलीत करूनच दिवाळीचे उत्साही स्वागत करण्यात येते. आजच्या बदलत्या युगातही पणतीचे महत्व अद्याप तरी कमी झालेले नाही. तरीदेखील एकेकाळी पणत्यांसाठी प्रसिध्द असलेल्या डिचोली शहरातील कुंभारवाडा-बोर्डे येथील पारंपरिक पणती व्यवसायाला आता उतरती कळा लागली असून हा पारंपरिक व्यवसाय लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

पणती व्यवसायामागील अडचणी आणि युवा पिढीची अनास्था आदी काही कारणांमुळे हा व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असला तरी कर्नाटकातील खानापूर आणि राजस्थानमधील पणत्यांचे बाजारपेठेतील वाढलेले आक्रमण हेसुध्दा या व्यवसायाला उतरती कळा लागण्यामागचे एक कारण असल्याचे समजते. तशी खंत काही जाणकार मातीकाम कलाकारांकडून व्यक्‍त होत आहे. कुंभार म्हटले, की फिरत्या चाकावर मातीला आकार देणारे व्यक्‍तीमत्व डोळ्यासमोर उभे राहते. कुंभार समाजाचे मातीशी नाते जोडलेले आहे. शहरातील कुंभारवाड्यावर कुंभार समाजातील लोकांची जवळपास वीस घरे आहेत. या वाड्यावरील बहुतेक कुंभार बांधव माती कलेत आहेत. या वाड्यावर गणपतीच्या चित्रशाळाही आहेत. 

एक काळ असा होता, की दिवाळी जवळ आली, की या वाड्यावर पणत्या बनविण्यासाठी लगबग चालायची. बहुतेक कुटुंबे पणत्या बनवत होती. पुरुषांबरोबर महिलांचेही हात पणत्या बनवण्याच्या कामात व्यग्र असायचे. एकाच दिवाळी सणावेळी डिचोलीतील कुंभारवाड्यावर १० हजाराहून अधिक पणत्या बनवण्यात यायच्या. या पणत्या डिचोलीसह म्हापसा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होत असत. आमच्या पुर्वजांपासून हा व्यवसाय चालत होता, अशी माहिती या वाड्यावरील एक प्रसिध्द मातीकाम कलाकार विलास कुंकळ्येकर यांनी दिली. 

विकत घेवून व्यवस्था !
दिवजोत्सवावेळी बारा देवस्थानांना पणत्या पुरवण्याची जबाबदारी आमच्या कुटुंबावर होती. त्यामुळे दिवाळीची संधी साधून पूर्वीपासूनच आपले कुटुंब पणत्या बनवत असत. मात्र, आता पणत्या बनवणे बरेच कटकटीचे बनले आहे. हा व्यवसाय परवडत नसल्याने तो सोडून द्यावा लागला आहे. बहुतेक देवस्थानांना पणत्या पुरवण्याची जबाबदारीही सोडून दिली आहे. आता फक्‍त दोन देवस्थानांना पणत्या पुरवाव्या लागतात. परंतु त्याही विकत घेवून व्यवस्था करावी लागते, अशी माहिती मातीकाम कलाकार रमाकांत शेटकर यांनी दिली. 

युवा पिढीचे दुर्लक्ष
कुंभारवाडा हा एकेकाळी पणत्या मिळण्यासाठी प्रसिध्द होता. मात्र, या व्यवसायात येणाऱ्या अनेक अडचणींमुळे गेल्या सहा-सात वर्षांपासून या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. पणत्या भट्‌टीत भाजण्यासाठी लागणारी लाकडे मिळणे दुरापास्त झाल्याने आणि माती उपलब्ध होण्यातील अडचण यामुळे बहुतेक माती कलाकारांनी पणती तयार करण्याच्या पारंपरिक व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे. त्यातच अनास्था म्हणा किंवा वेळेचा अभाव म्हणा आजची युवा पिढी या पारंपरिक व्यवसायाकडे रस दाखवत नाही. सध्या वाड्यावरील एक-दोन कंटुंबे पणती व्यवसायात असली, तरी पणत्या बनवण्याचे प्रमाण अगदीच कमी आहे. पणत्या आदी मातीच्या कलाकृती भाजण्यासाठी बांधण्यात आलेल्या काही भट्ट्याही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातील काही बंदावस्थेत आहेत.
 

संबंधित बातम्या