गोवा मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण; गोव्‍याची स्‍वयंपूर्णतेकडे वाटचाल!

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मार्च 2021

डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, मुख्यमंत्रिपदी आलो तेव्हा राज्याची तिजोरी तशी रितीच होती.

पणजी : (Dr Pramod Sawant completes two years as Chief Minister Goa journey towards self sufficiency) गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षात राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी टाकलेली पावले ही माझ्यासाठी महत्त्‍वाची बाब आहे. पायाभूत सुविधांच्या विकासासोबत मनुष्यबळ विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतून काय साधले, हे येत्या काही वर्षांनी समजणार आहे. कोविड महामारीच्या काळात केलेले व्‍यवस्थापन अविस्मरणीय आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत Dr Pramod Sawant यांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या मुलाखतीवेळी हे सारे भरभरून सांगितले.

डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, मुख्यमंत्रिपदी आलो तेव्हा राज्याची तिजोरी तशी रितीच होती. खाणकाम बंदीचा फटका जाणवू लागला होता. या कठीण काळात आर्थिक व्यवस्थापन करणे कठीण बाब होती. विरोधक राज्य कर्जाच्या फेऱ्यात अडकणार, अशी नाहक टीका करत होते. मात्र, आम्ही केंद्रीय अर्थ मंत्रालयाने घालून दिलेली कर्जाची मर्यादा कधीही ओलांडली नाही. 10 वर्षांपूर्वी घेतलेली कर्जे आता फेडावी लागत असल्याने, नव्याने कर्ज घेणे क्रमप्राप्त होते. राज्यभरात विकासकामांचा धडाका लावण्‍यात आला आहे. त्यासाठी निधी पुरवणे गरजेचे होते. मात्र, वित्त व्यवस्थापनातून राज्यावर कर्जाचा फारमोठा बोजा टाकला नाही.(Dr Pramod Sawant completes two years as Chief Minister Goa journey towards self sufficiency)

‘आत्‍मनिर्भर भारत’ संकल्‍पना चालीस लावली

ते म्हणाले, हे सारे करताना बारीकसारीक गोष्टीसाठी इतर राज्यांवर अवलंबून राहावे लागत असल्याची बाब प्रकर्षाने जाणवली. राज्याच्या गरजा राज्यातच भागल्या पाहिजेत, यासाठी स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना चालीस लावली. ही संकल्पना माझ्या मनात आमदार म्हणून निवडून आल्यापासून घोळत होती. आता ती राबवण्याची संधी मिळाली. योगायोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचकाळात ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेची घोषणा केली आणि या योजनेला ती पूरक ठरली. गावागावातील गरजा आता स्थानिक पातळीवर भागू शकतील. गोवा मुक्तीची साठ वर्षे पूर्ण होतील, तेव्हा 19 डिसेंबरला गोवा काही बाबतीत तरी निश्चितपणे स्वयंपूर्ण झालेला असेल. हे सारे करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य स्वयंपूर्ण मित्रांच्या रुपाने मिळत आहे.(Dr Pramod Sawant completes two years as Chief Minister Goa journey towards self sufficiency)

शिक्षणाची कवाडे खुली होणार

मनुष्यबळ विकासासाठी मुख्यमंत्री ॲप्रेंटीशिप योजनेची कार्यवाही सुरू केली. अनेक सरकारी खात्यांनी आता प्रशिक्षणार्थी मनुष्यबळ नेमले आहे. कोणत्याही पदासाठी व्यक्तीला नेमताना यापुढे त्याने कामाचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक करता येणार आहे. श्रमाची एक संस्कृती असते. ती श्रम संस्कृती रुजवण्याचे हे प्रयत्न आहेत. शिक्षण घेणे आणि त्याच्याआधारे काम करण्याची मानसिकता व तयारी करणे या दोन्ही भिन्न बाबी आहेत. त्यामुळे शिक्षण घेतलेले मनुष्यबळ बहुतेकवेळा कामाच्या उपयोगाचे नाही, असे ऐकावयास मिळते. यासाठी कौशल्‍य विकासाला चालना देत त्या माध्यमातून मनुष्यबळ विकास साधला जात आहे. खासगी विद्यापीठे राज्यात आल्यावर शिक्षणाची विविध कवाडे

राज्यातील युवा वर्गासाठी खुली होणार आहेत

सरकारविरोधात अफवा पसरवण्याचे काम पद्धतशीरपणे केले जाते. संघटितपणे हे काम होण्यासाठी कोणती तरी शक्ती कार्यरत आहे. जनतेने अशा अफवांकडे लक्ष न देता सरकार राबवत असलेल्या अनेक योजनांचा लाभ आपल्याला कसा घेता येईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, या अंत्योदय तत्त्‍वावर सरकार काम करते असे सांगून ते म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकासाठी सरकार काही ना काही देते. त्यासाठी विविध योजनांची आखणी केली आहे. कोविड काळात आर्थिक प्रतिकूल परिस्थितीशी सामना करूनही कल्याणकारी योजना सुरू ठेवल्या. 

रोजगारनिर्मितीवर भर
मरीटाईम क्लस्टर वेर्णा येथे सुरू केला. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. त्यात 49 गोमंतकीय उद्योजक एकवटले आहेत. युवा वर्गाला त्यांच्या करिअरविषयी सुयोग्य, असे मार्गदर्शन करण्यासाठी आदर्श असे करिअर सल्ला केंद्र सरकारने सुरू केले आहे. त्या केंद्राच्या माध्यमातून विविध करिअर संधींवर संवादही साधणे सुरू झाले आहे. खासगी क्षेत्रासाठी मनुष्यबळ पुरवण्याचे कामही सरकारने स्वेच्छेने स्वीकारले, ‘गोवाऑनलाईन डॉट जीओव्‍ही डॉट आयएन’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून युवा वर्गाला खासगी क्षेत्रातील संधींची माहिती मिळू लागली आहे. कोविड काळात व्यवसाय गमावलेल्या व्यावसायिकांना शुल्कमाफीही सरकारने दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

पुढील दूरदृष्‍टी...

मुख्‍यमंत्र्यांनी सांगितले, ‘मनोहर पर्रीकर स्कूल ऑफ लॉ’च्या इमारतीची पायाभरणी केली आहे. सार्वजनिक प्रशासन, दिव्यांग अभ्यास, आदिवासींचा अभ्यास, समाजिक समरसता अभ्यास, सर्वसमावेशक धोरणांचा अभ्यास अशा विविध विद्याशाखा तेथे सुरू केल्या जाणार आहेत. कुडचडे येथे संजय स्कूलच्या बांधकामासाठी 4 हजार चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध केला आहे. काणकोणचा बगल महामार्ग खुला केला, डिचोलीच्या मार्केट प्रकल्पाचे लोकार्पण केले, धारबांदोडा येथील प्रशासकीय संकुल जनतेसाठी खुले केले, मये येथे बंगी जपिंग सुविधा उपलब्ध केली, दाबोळीतील ग्रेड सेपरेटर, पंचवाडीतील पंचायत कार्यालय इमारतीचे उद्‍घाटन केले. चोडण पणजी मार्गावर नवी फेरीबोट उपलब्ध केली. कदंबच्या ताफ्यात लवकरच विजेवर चालणाऱ्या100 बस येतील. त्यानंतर सरकारी वाहनेही याच पद्धतीची असतील असे नियोजन करण्यात येत आहे. राज्यात सौर उर्जा निर्मितीचीही मोहीम राबवण्यात येत आहे.

 

संबंधित बातम्या