संजीवनी कारखान्‍याबाबत समितीकडून अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

साखर कारखान्याबाबत त्वरित निर्णय घेण्यासंदर्भात काही महत्वपूर्ण सूचना लिखित अहवाल स्वरूपात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आज सुपूर्द केल्या आहेत. 

पणजी: धारबांदोडा येथे संजीवनी सहकारी साखर कारखान्यासमोरील  ३० एकरच्या भूखंडावर उच्च प्रतीच्या ऊस बियाण्याची लागवड जानेवारी २०२१ पर्यंत करावी, जेणेकरून ऑक्टोबर वा नोव्हेंबर २०२१ मध्ये ऊस उत्पादकांना चांगल्या बियाणे उपलब्ध करता येईल अशी सूचना सरकार नियुक्त ऊस उत्पादक सुविधा समितीने सरकारला केली. साखर कारखान्याबाबत त्वरित निर्णय घेण्यासंदर्भात काही महत्वपूर्ण सूचना लिखित अहवाल स्वरूपात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आज सुपूर्द केल्या आहेत. 

मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या याविषयीच्या अहवालात समितीने म्हटले आहे, की कारखान्याचा शेती विभाग गोवा सरकारच्या शेती खात्याच्या मदतीने व सहकार्याने कारखान्याला सशक्त करावे. डेक्कन साखर टेक्नॉलॉजी असोसिएशनमार्फत कारखान्याच्या आधुनिकीकरणासाठी तसेच इथेनॉल जोड-निर्मिती संबंधी अहवाल करून घेण्यात यावा. संकेश्वर येथील गूळ संशोधन संस्थेमार्फत जैविक गूळ उत्पादनासंबंधी अहवाल करून घेण्यात यावा. दोन्ही अहवाल फेब्रुवारी २०२१ पर्यंत पूर्ण व्हावेत. यामुळे पुढील नियोजन करता येईल. वरील अभ्यासामुळे व चांगल्या तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादकांना चांगला दर देणे शक्य होईल. यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ऊस उत्पादकाना ६०० रुपये प्रति टन व नुकसान भरपाई त्वरित देण्यात येईल असे सांगितले.

संबंधित बातम्या