भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ. शीतल नाईक यांची नियुक्ती

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑक्टोबर 2020

डॉ. नाईक दोनवेळा नगरसेविका म्हणून पणजीतून निवडून आल्या आहेत. त्यांनी संघटनात्मक कामात मोठे योगदान दिले आहे.

पणजी- भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी बालभवनच्या अध्यक्ष, पणजीच्या नगरसेविका डॉ. शीतल नाईक यांची आज नियुक्ती करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी ही नियुक्ती पत्रकार परिषदेत जाहीर केली. यावेळी मावळत्या प्रदेशाध्यक्ष सुलक्षणा सावंत या उपस्थित होत्या.

यावेळी तानावडे म्हणाले, सावंत या पाच वर्षे या पदावर कार्यरत होत्‍या. संघटनात्मक काम असो किंवा आंदोलने त्यात महिलांची ताकद त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत उभी केली. महिलांचे संघटन त्यांनी केले. नवा प्रदेशाध्यक्ष झाला की सर्व मोर्चाच्या अध्यक्षांची नियुक्ती नव्याने केली जाते. जानेवारीत नवा प्रदेशाध्यक्ष झाला, पण त्यानंतर जिल्हा पंचायत निवडणूक आणि कोविड महामारीची टाळेबंदी यामुळे मोर्चाच्या अध्यक्षांची निवड लांबणीवर पडली होती. आता एकेक मोर्चाच्या अध्यक्षांची नियुक्ती जाहीर करणे सुरू केले आहे.

यादरम्यानच्या काळात भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सावंत यांनी समर्थपणे पेलली. कोविड महामारीच्या काळात पक्षाने दिलेली जबाबदारी, समाजाला मदत करण्यासाठी कार्यकर्त्यांची जमवाजमव त्यांनी केली. त्यांनी कोविड महामारीच्या काळात जनतेला सेवा देण्यासाठी सदोदित पुढाकार घेतला. रक्षाबंधन कार्यक्रमही त्यांनी यशस्वी केला. कोविड योद्ध्यांना राखी बांधण्याचे कार्यक्रम हा होता. 

आता नव्याने महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून डॉ. शीतल नाईक यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्या आजवर मोर्चाच्या चिटणीस म्हणून कार्यरत होत्या. स्वतंत्रपणे काम करण्याची शैली आहे. वक्तृत्व व नेतृत्व त्या सिद्ध करतील. येत्या आठ ते दहा दिवसात त्या मोर्चाच्या उपाध्यक्ष, सरचिटणीस, राज्याची कार्यकारिणी, जिल्हा समित्या यांचे संघटन करतील, असे तानावडे यांनी सांगितले.

यावेळी सावंत म्हणाल्या, डॉ. नाईक दोनवेळा नगरसेविका म्हणून पणजीतून निवडून आल्या आहेत. त्यांनी संघटनात्मक कामात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या हाती धुरा सोपवताना मला आनंद होत आहे. त्या पक्षाचे संघटनात्मक काम पुढे नेतील याबद्दल शंका नाही.

डॉ. नाईक म्हणाल्या, मला समाजकार्यासाठी कायम प्रोत्साहन देणारे माझे सासरे स्व. मधुकर पोकू नाईक आणि राजकारणात मला संधी देणारे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची उणीव जाणवत आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणूनच मी काम सुरू ठेवणार आहे. मी व माझे पती दत्तप्रसाद नाईक यांनी पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी पेलली आहे. यापुढेही आम्ही पक्षाचे कामच पुढे नेत जाणार आहोत.

संबंधित बातम्या