नाट्यसेवा ही ईश्वरसेवा आहे, याचा गोमंतकीयांना प्रत्यय

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020

नाट्यक्षेत्रात गोव्याने दिग्गज कलाकार दिले आहेत. त्यांचे रंगभूमीसाठीचे योगदान फार मोठे आहे. नाट्यसेवा ही ईश्वरसेवा आहे, असे भरतमुनींनी सांगितले आहे. त्याचा प्रत्यय आपण गोमंतकीयांनी घेतला आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले.

पणजी :  नाट्यक्षेत्रात गोव्याने दिग्गज कलाकार दिले आहेत. त्यांचे रंगभूमीसाठीचे योगदान फार मोठे आहे. नाट्यसेवा ही ईश्वरसेवा आहे, असे भरतमुनींनी सांगितले आहे. त्याचा प्रत्यय आपण गोमंतकीयांनी घेतला आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केले.

सम्राट क्लब चोडणतर्फे आज (गुरुवारी) येथील चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात आयोजित केलेल्या मराठी रंगभूमीदिन कार्यक्रमात कामत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमात सव्यसाची ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अजय वैद्य यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. सम्राट क्लब चोडणने ऑनलाइन पद्धतीने घेतलेल्या विजेत्यांस पारितोतोषिके प्रदान करण्यात आली. व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे सम्राट क्लब इंटरनॅशनल क्लबचे राज्य अध्यक्ष डॉ. उदय कुडाळकर,कार्यकारी अध्यक्ष ॲड. अवधूत सलत्री, माजी राज्य अध्यक्ष तथा माजी आमदार धर्मा चोडणकर, सम्राट क्लब चोडणचे अध्यक्ष जगन्नाथ ठाणेकर, सचिव सागर च्यारी, निर्मला शिरगावकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.

एककाळ असा होता, की हौशी रंगभूमीवर मराठी नाटकांचे भरमसाठ प्रयोग व्हायचे. आमच्या शेजारी पिंपळकट्टयावर सार्वजनिक पूजेला सलग २१ नाटकांचे प्रयोग व्हायचे ही आठवण सांगून कामत म्हणाले, डॉ. अजय वैद्य यांचे रंगभूमीवरील कार्य महत्त्वपूर्ण आहे. सात वर्षे आपण कला संस्कृती मंत्री असताना कलाकार कृतज्ञतानिधी सारख्या योजना राबविल्या. कारण उतार वयात कलाकारांना आधार मिळावा. इथले कलाकार इथेच राहून मोठे व्हावेत, हेही ध्येय ठेवून योजना आखल्या.
ॲड. सलत्री म्हणाले, सम्राट परिवारात चांगले सदस्य यावेत, ठिकठिकाणी क्लबचे जाळे पसरून राज्यात, देशात चांगल्या मूल्यांचा प्रसार करावा हे सम्राटचे ध्येय आहे. आज डॉ. अजय वैद्य यांचा गौरव होत आहे याचा सम्राटला अभिमान आहे. यावेळी डॉ. कुडाळकर यांचेही भाषण झाले. डॉ. अजय वैद्य यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच त्यांनी कुसुमाग्रज यांच्या रंगभूमी संदर्भातील कविता प्रभावीपणे सादर करून दाद घेतली.

नाट्यगीत स्पर्धेतील एक विजेती स्पर्धक अंशिका नाईक हिने यावेळी ‘धाडीला राम तिने का वनी’ या नाटकातील ‘या लता शिकविते रित...’ हे पद प्रभावीपणे गावून सर्वाची उत्स्फूर्त दाद घेतली. डॉ. लता नाईक यांनी सूत्रत्संचलनाची बाजू छान सांभाळली. जगन्नाथ ठाणेकर यांनी स्वागत केले. अंकिता शिरगावकर, सगुण चोडणकर, कमलाकांत वाडयेकर (सरपंच) यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. रजनी चोडकर यांनी मानपत्राचे वाचन केले. सुरेश चोडणकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. धर्मा चोडणकर यांनी अजय वैद्य हे प्रगल्भ कलाकार असून त्यांना पुरस्कार दिल्याने सम्राट क्लब चोडणची प्रतिष्ठा वाढली आहे, असे नमूद केले.

संबंधित बातम्या