डॉ. वंदना सावंत यांचे कार्य कौतुकास्पद

Laxman Othavnekar
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हैराण करून सोडले आहे. या पार्श्वभूमीवर देशभर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतांश सर्व यंत्रणा ठप्प झाल्या. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद होते. अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर शहर तसेच मुख्य इस्पितळांमध्ये कार्यरत झाले. बहुतांश ग्रामीण भागातील खासगी दवाखाने बंदच होते. त्यामुळे वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी समस्या निर्माण झाली होती. लोकांची ही गैरसोय लक्षात घेऊन हरमल येथील डॉ. वंदना सावंत यांनी लॉकडाऊनच्या काळात हरमल परिसरासह, पालये व केरी गावाला वैद्यकीय सेवा दिली.

तेरेखोल
कोरोना महामारीच्या काळात केरी (पेडणे) परिसरातील लोकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिलेल्या कोरोना योद्धा डॉ. वंदना सावंत यांनी चांगली सेवा देऊन स्थानिकांची मने जिंकली तसेच परिसरातील लोकांशी आपुलकीचे आणि स्नेहभावाचे नाते दृढ केले. एप्रिल ते जुलैपर्यंत एकूण चार महिने त्यांनी केरी गावात रुग्णसेवा बजावताना ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून कोविडवर मात करण्याचा आत्मविश्वास रुग्णामध्ये निर्माण केला. या काळात त्यांच्याकडे केरी -तेरेखोल, पालये, हरमल आदी गावातून रुग्ण तपासणीसाठी येत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशासह राज्यांतील सगळे व्यवहार ठप्प झाले. या दरम्यान परराज्याच्या सीमाही बंद झाल्या. अशा परिस्थितीत गावात एखादी व्यक्ती आजारी पडल्यास वैद्यकीय सेवा मिळणे मुश्किल झाले होते. लॉकडाऊनपूर्वी केरी गावात महाराष्ट्रातून डॉ. गायकवाड व डॉ. कुबल येऊन रुग्णांची तपासणी करीत होते. त्यामुळे स्थानिकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हायची, परंतु लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील डॉक्टर सीमा ओलांडून गोव्यात येऊ शकत नसल्याने केरीतील लोकांची डॉक्टरांअभावी मोठी गैरसोय झाली. त्यामुळे गावातील काही नागरिकांनी पेडण्याचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रकांत शेटकर यांच्याकडे ही समस्या मांडली होती, परंतु स्थानिक डॉक्टरांना मान्यता देऊ, पण परराज्यांतून डॉकटर आणण्यास परवानगी देता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर लॉकडाऊन काळात अत्यंत आवश्यकता भासल्याने केरी तेरेखोल पंचायतीचे माजी उपसरपंच आनंद शिरगावकर व विद्यमान उपसरपंच सौ. आकांक्षा शिरगावकर यांनी केरी येथे वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी हरमल येथे स्वतःचे क्लिनिक सांभाळणाऱ्या बालरोग चिकित्सक डॉ. वंदना सावंत यांच्याशी संपर्क साधून त्यांना केरी परिसरात वैद्यकीय सेवा देण्याची विनंती केली. डॉ. वंदना यांनी त्याला त्वरित होकार दिला व १३ एप्रिलपासून सायंकाळी ३ ते ५ या वेळेत केरी गावात रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यास प्रारंभ केला.
डॉ. सावंत यांनी बालरोग, मानसोपचार चिकित्सक, त्वचारोग, स्त्रीरोग, संधीवात, हाडांचे रोग, फुफ्फुसाचे विकार आदी विविध रोगाबद्दल डॉ. एम. एल. ढवळे संशोधन चिकित्साशास्त्र हॉस्पिटल, डॉ. ढवळे ट्रस्ट बाल चिकित्सा हॉस्पिटल, दहीसर - मुंबई येथे काम केलेले आहे. सध्या त्या आपल्या हरमल येथील दवाखान्यात कार्यरत आहेत. लॉकडाऊन काळांत त्यांनी केरी येथील त्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांच्या सर्व व्याधीवर उपचार केल्याने अनेकांच्या व्याधी दूर झाल्या. अनेकांना दिलासा मिळाला. तसेच त्यांनी कोरोना विषाणूसंदर्भात कोणती काळजी घ्यावी याबद्दलही रुग्णांना योग्य मार्गदर्शन केले. दवाखान्यात तपासणीसाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची आस्थेने चौकशी करून त्यांना धीर देत त्यांच्यात आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. कोविड महामारीच्या काळात जेथे वैद्यकीय सेवा उपलब्ध होत नव्हती, अशावेळी लॉकडाऊनच्या काळात केलेल्या जनसेवेबद्दल डॉ. वंदना सावंत यांचे या परिसरात कौतुक होत आहे.
दरम्यान, आपण दिलेल्या वैद्यकीय सेवेमुळे रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर फुलणारे हास्य हेच आपले समाधान असल्याचे डॉ. वंदना सावंत यांनी सांगितले.

संपादन - यशवंत पाटील

 

संबंधित बातम्या