हळदोणे गावात राजकीय मानापमान नाट्य

dainik Gomantak
बुधवार, 1 जुलै 2020

हळदोणेत सध्या राजकीय मानापमान नाट्य सुरू असून प्रभारी सरपंच शुक्रादिनी पोळे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पंचायत मंडळाने आमदार टिकलो यांना जोरदार विरोध दर्शवला आहे. पंचायतीला प्रदान केलेल्या स्वयंचलित सॅनिटायझरच्या उद्‌घाटनासाठी अधिकृतरीत्या आमदारांनी आपणास निमंत्रित केले नाही, हाच त्यासंदर्भातील कळीचा मुद्दा आहे.

म्हापसा
हळदोणे पंचायत मंडळाची बैठक बुधवार १ जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार असून त्या बैठकीत आमदार ग्लेन टिकलो यांच्याविरोधात सत्ताधारी गटाकडून जोरदार आवाज उठवला जाणार आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. अकरा सदस्यीय या पंचायतीच्या सत्ताधारी गटात प्रभारी सरपंच या नात्याने भूमिका बजावणाऱ्या उपसरपंच शुक्रादिनी पोळे यांच्याबरोबरच प्रियंका पिंटो, दीपक नाईक, तेजा वायंगणकर, सुभाष राऊत, प्रणेश नाईक, स्मिता मयेकर अशा सातजणांचा समावेश आहे. विरोधी गटात २० मे रोजी सरपंचपदावरून पदच्यूत झालेले पंचायत सदस्य फ्रान्सिस डिसोझा, थॉमस तावारीस, गजानन हळदणकर व डेविस फर्नांडिस अशा चारजणांचा समावेश आहे. पंचायतीच्या विरोधी गटात असलेले हे चार पंचायत सदस्य आमदार ग्लेट टिकलो यांचे खंदे समर्थक आहेत.
काही दिवसांपूर्वी आमदार टिकलो यांनी स्वत:च्या कर्मचाऱ्याला पंचायत कार्यालयात पाठवून स्वयंचलित सॅनिटायझर पंयायतीला दिले होते व त्याचे उद्‌घाटन टिकलो यांनी स्वत: त्या चार पंचायत सदस्यांच्या उपस्थितीत केले होते. त्या उद्‌घाटन सोहळ्याबाबत पंचायतीच्या प्रभारी सरपंच तसेच सत्ताधारी गटातील पंचायत सदस्यांना कळवण्यात आले नव्हते. तसेच पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनाही त्याबाबत काहीच कळवण्यात आले नव्हते, असा दावा प्रभारी सरपंच पोळे यांनी केला आहे. प्रभारी सरपंचाला तसेच सत्ताधारी गटातील कोणाही पंचायत सदस्याला विश्‍वासात न घेतल्याने आम्ही कुणीच त्या उद्‌घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहिलो नाही, असेही पोळे यांनी यासंदर्भात स्पष्ट केले आहे. केवळ टिकलो यांचे समर्थक असलेले विरोधी गटातील पंचायत सदस्य त्या कार्यक्रमाला उपस्थित होते, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आमदारांनी हळदोणे पंचायतीला दिलेले सॅनिटायझर त्यांना परत करण्याचा निर्णय पंचायत मंडळाने घेतलेला आहे, असे यासंदर्भात माहिती देताना पोळे यांनी सांगितले. त्यामुळे सध्या हळदोणेत राजकीय मानापमान नाट्य खूपच रंगलेले आहे. सध्या आमदार टिकलो राजकीय बळ वापरून गटविकास कार्यालयावर दबाव आणत आहे. त्यामुळे पंचायत मंडळाच्या बैठकीला पंचायत सचिव उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणूनच पंचायतीच्या बैठका वारंवार तहकूब कराव्या लागल्या, असा दावाही प्रभारी सरपंच पोळे यांनी केला आहे.
जो आमदार स्थानिक सरपंचाचा आदर करीत नाही, त्याचा मान राखत नाहीत; त्या आमदार टिकलो यांच्या विरोधात हळदोणेवासीय संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले. राजकीय बळ वापरून या पंचायत मंडळावर दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांनी यापुढे केल्यास त्याची फळे त्यांना भोगावी लागतील व ते त्यांना महागात पडेल, असा टोलाही सौ. पोळे यांनी हाणला.

Goa Goa Goa Goa Goa

संबंधित बातम्या