गोवा कृषिप्रधान राज्य करायचे स्वप्न: उपमुख्यमंत्री कवळेकर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

‘कृषी खात्याने या मोसमात पाच पट जास्त म्हणजे तब्बल १५०० किलो बियाण्यांची विक्री केली आहे. याचा अर्थ यंदा भाज्यांचे बम्पर पीक येणार आहे. शेतीकडे लोकांनी व्यवसाय म्हणून पाहावे यावर कृषी खात्याचा भर असेल.' असे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितले. 

मडगाव: गोवा पुन्हा कृषिप्रधान राज्य करायचे आपले स्वप्न असून, कृषी खात्याने त्या दिशेने आशादायक वाटचाल सुरू केली आहे, असे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी बेतुल येथे सांगितले. 

कवळेकर यांनी स्वातंत्र्यदिनी बेतूल येथे त्यांच्या निवासस्थानासमोर आयोजित कार्यक्रमात ध्वजारोहण केले. बेतुलचे सरपंच तातो केरकर, फातर्पाच्या सरपंच मंदा देसाई आणि खोलचे उपसरपंच पंढरी प्रभुदेसाई, फातर्पाच्या पंच मेदिनी नाईक, शीतल सुरेंद्र नाईक, सेंझिल डिकॉस्ता यावेळी  उपस्थीत होते. 

यंदा ‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर पणजी वगळता इतर ठिकाणी ध्वजारोहणाचे सार्वजनीक कार्यक्रम न करण्याचे राज्य मंत्रिमंडळाने गेल्या बैठकीत ठरविले होते. त्यानुसार कवळेकर यांनी बेतुल येथे ध्वजारोहण केले. 

‘कृषी खात्याने या मोसमात पाच पट जास्त म्हणजे तब्बल १५०० किलो बियाण्यांची विक्री केली आहे. याचा अर्थ यंदा भाज्यांचे बम्पर पीक येणार आहे. शेतीकडे लोकांनी व्यवसाय म्हणून पाहावे यावर कृषी खात्याचा भर असेल. काजूच्या आधारभूत किंमतीत २५ टक्क्यांनी वाढ, काजू रोप लागवडीसाठी कृषी कार्डची आवश्यकता काढणे तसेच खोला मिर्चीसाठी नवीन योजना यासारखे  महत्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत’, असे कवळेकर पुढे म्हणाले.  

आपल्याला स्वातंत्र्यासाठी दिलेल्या प्रत्येक बलिदानाची आठवण ठेवलीच पाहिजे. कारण त्या बलिदानांशिवाय आजचा भारत घडलाच नसता, असे कवळेकर यांनी सांगितले.    

राज्यातील छोटे भूखंड रूपांतर प्रक्रियेकडे तसे फारसे कोणी आजपर्यंत बघितले नव्हते. पण, डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार खऱ्या अर्थाने जनसामान्यांचे असल्याने, खात्याचा पदभार सांभाळल्यानंतर नगर नियोजन खात्याने प्रामुख्याने छोट्या भूखंड धारकांच्या अर्जांना न्याय दिला, असे उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या