गोव्याला जाताय..मग सावधान ! मद्यपान केल्यास होणार 10 हजार रुपयांचा दंड!

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

 पर्यटकांच्या बेशिस्तीमुळे किनार्‍यांवर कचरा साचल्यामुळे गोवा सरकारने एक सनसनाटी निर्णय घेतला आहे. यापुढे समुद्रकिनार्‍यावर मद्यपान करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

पणजी :  पर्यटकांच्या बेशिस्तीमुळे किनार्‍यांवर कचरा साचल्यामुळे गोवा सरकारने एक सनसनाटी निर्णय घेतला आहे. यापुढे समुद्रकिनार्‍यावर मद्यपान करण्यास परवानगी दिली जाणार नाही. गोवा टुरिझमने म्हटले आहे की नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आणि समुद्रकिनार्‍यांवर मद्यपान केल्याबद्दल 10,000 रुपये दंड आकारला जाईल. पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले की, नवीन वर्षाच्या स्वागतानंतर गोव्याच्या समुद्रकिनारा दारूच्या बाटल्यांनी अक्षरश: ओसंडून वाहत होता, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

गोवा टुरिझमचे संचालक मेनिनो डिसोझा म्हणाले की, समुद्रकिनार्‍यावर लोकांना मद्यपान करू नका, असा इशारा देण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत.  राज्य सरकारने समुद्रकिनार्यावर मद्यपान केल्यास 2 हजार रुपये आणि गटांवर 10,000 रुपये दंड आकारण्यासाठी जानेवारी 2019 मध्ये पर्यटन व्यापार कायद्यात सुधारणा केली होती. 

संबंधित बातम्या