‘दृष्टी’ची फेरीबोटसेवा दोन वर्षांपासून खंडित

प्रतिनिधी
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

प्रतिनिधी--केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बायणा समुद्र किनाऱ्यावर मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या सहाय्याने दृष्टी मरीन कंपनीने वास्को ते पणजीपर्यंत सुरू केलेली फेरीबोट सेवा गेली दोन वर्षे खंडीत ठेवून एकप्रकारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नांना तिलांजली लावण्याचा प्रकार वास्कोत घडला आहे

मुरगाव: प्रतिनिधी--केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बायणा समुद्र किनाऱ्यावर मुरगाव पोर्ट ट्रस्टच्या सहाय्याने दृष्टी मरीन कंपनीने वास्को ते पणजीपर्यंत सुरू केलेली फेरीबोट सेवा गेली दोन वर्षे खंडीत ठेवून एकप्रकारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नांना तिलांजली लावण्याचा प्रकार वास्कोत घडला आहे. बायणा किनाऱ्यावरील जागा बळकावण्यासाठीच दृष्टी मरीन कंपनीने फेरीबोट सेवेचा प्रारंभ केला होता का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

बायणा समुद्रात तरंगता धक्का उभारून दृष्टी मरीन कंपनीने फेरीबोट सेवा सुरू केली होती. त्याचे उद्‍घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २० मार्च २०१८ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर, नगरविकास मंत्री ख्रि. फ्रा़न्सिस डिसोझा, तत्कालीन उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, मंत्री बाबू आजगावकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, निलेश काब्राल, जयेश साळगांवकर, विनोद पालयेकर, मायकल लोबो, सुदिन ढवळीकर या आजी माजी मंत्री, आमदार कार्लुस आल्मेदा, एलीना साल्ढाणा, राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, एमपीटीचे तत्कालीन अध्यक्ष आय. जयकुमार, माजी नगराध्यक्ष दीपक नागडे यांच्या उपस्थितीत केले होते. या नव्या प्रकल्पामुळे गोव्यातील सागरी पर्यटनाला वाव मिळेल असा विश्वास त्यावेळी केंद्रीय मंत्री श्री गडकरी यांनी व्यक्त केला होता.

दृष्टी मरीन कंपनीने बायणा किनाऱ्यावर तरंगता धक्का उभारुन वास्को ते पणजीपर्यंत सागरी वाहतूक सुरू केल्याने रस्ता वाहतुकीवरील बराच ताण कमी होईल, असेही नेत्यांनी मत व्यक्त केले होते. दाबोळी विमानतळावरील प्रवाशांना सोयीस्कर व्हावे या उद्देशाने ही फेरीबोट सेवा सुरू करण्यात आली होती. पण, अवघ्या दोन महिन्यांत ही सेवा बंद करण्यात आली ती आजपावेतो सुरूच झालेली नाही.

गतवर्षी पहिल्याच पावसाळ्यात समुद्रात उभारलेला तरंगता धक्का वाहून गेला, तो त्यानंतर पुन्हा उभारण्याचा कोणताच प्रयत्न कंपनीने केला नाही. बायणा किनाऱ्यावर दृष्टी मरीन कंपनीचे जीवरक्षकांचे काम सुरू आहे. मात्र, फेरीबोट सेवा खंडित करण्यात आल्याने कार्यालय बंद केले आहे.
 

संबंधित बातम्या