केप्‍यात थेंबभर पाण्‍यासाठीही वणवण

Dainik Gomantak
मंगळवार, 26 मे 2020

फरफट थांबणार कधी? किमान चार तास पाणीपुरवठा करण्‍याची मागणी

कुंकळ्‍ळी

केपे मतदारसंघातील सुबदळे, बार्से, पिल्ला, पाडी, वारवतीमल, काजुमळ व अन्‍य ग्रामीण भागात लोक पाण्‍यासाठी अक्षरश: वणवण करीत आहेत. जायका व अन्‍य योजनांमार्फत पाणीपुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा केला जातो, तरीही केपे तालुक्‍यातील लोकांच्‍या नशिबी एक घोटसुद्धा पाणी मिळणे दुरापास्‍त झाले आहे. २४ तास पाणीपुरवठा नको, तर किमान चार तास तरी नियमित पाणीपुरवठा करा, अशी मागणी स्‍थानिकांकडून केली जात आहे. उपमुख्‍यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्‍याकडून तशी तेथील मतदारांनी अपेक्षा ठेवली आहे.
गोवा मुक्त झाल्यास ५९ वर्षांचा काळ उलटला. गोव्याने अनेक क्षेत्रात प्रगती साधली, तरीही आजही गोव्याचा ग्रामीण भाग तहानलेलाच आहे. दक्षिण गोव्यातील केपे तालुक्यातील ग्रामीण भागात राहणारे लोक घोटभर पाण्यासाठी वणवण करीत आहेत. शहरी भागातील नळांना २४ तास पाणीपुरवठा होतो. मात्र, केपेतील ग्रामीण भागात एक एक थेंब पाण्‍यासाठी वणवण करावी लागत आहे.

झरी आटल्‍याने करवंटीतून भरताहेत पाणी....
पाणीसमस्‍येमुळे सुबदळे गावातील लोकांनी पारंपरिक झरीतले पाणी साठवून स्वत:चे पैसे खर्च करून जलवाहिन्या टाकून पाणी गावात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उन्हाळ्यात झरे आटल्याने नारळाच्या कट्टीने पाणी कळशीत भरण्याची पाळी लोकांवर येते. एक कळशीभर पाणी मिळविण्यासाठी कामधंदा सोडून तासन तास थेंबथेंब पाणी टिपण्‍यासाठी बसावे लागते. काही ठिकाणी टँकरने पाणी पुरविले जाते. त्‍यामुळे काही लोकांनी पाणी साठविण्यासाठी प्लास्टिकची पिंपेही घेतली आहेत. या भागातील घरे उंच टेकडीवर असल्यामुळे तिथपर्यंत टँकर जात नाही. त्‍यामुळे टेकडीच्‍या पायथ्‍याकडे ठेवलेल्‍या पिंपात साठा केलेले पाणी लोकांना डोक्‍यावर घेऊन टेकडी पार करावी लागते.

लग्‍नासाठी मुली देण्‍यास नकार
गेल्या अनेक वर्षांपासून लोक पाण्यासाठी वणवण करीत आहेत. मात्र, विद्यमान सरकार व पूर्वीच्या सरकारांनाही ग्रामीण भागातील लोकांना पाणी देण्यास अपयश आले आहे. पाणी नसलेला गाव म्हणून येथील युवकांना लग्‍नासाठी मुली देण्यास इतर भागातील पालक तयार होत नाहीत, असे येथील स्‍थानिकांनी आपल्‍या व्‍यथा मांडताना सांगितले. जे शिकलेले आहेत व नोकरी करतात त्यांनी नको ही कटकट म्हणून गाव सोडून शहराचा रस्ता धरला आहे. उपमुख्‍यमंत्री चंद्रकांत कवळेकर या लोकांना २४ तास नको, तर किमान चार तास तरी पाणीपुरवठा करतील काय? असा प्रश्‍‍न स्‍थानिकांकडून उपस्‍थित केला जात आहे.

संबंधित बातम्या