Burning Car : पेटत्या गाडीत मद्यधुंद चालकाचा दुर्दैवी अंत; तीन वाहनेही आगीच्या भक्ष्यस्थानी

टोंक करंझाळेतील थरार
Car Accident at Tonca-Panjim
Car Accident at Tonca-PanjimDainik Gomantak

Car Accident at Tonca-Panjim: टोंक-करंझाळे येथे रायकर इस्पितळाजवळ आज पहाटे 4:30 च्या सुमारास घडलेल्या एका थरारक घटनेत एका कारने आधी पार्किंगमधील वाहनांना धडक दिली. त्यानंतर अपघातग्रस्त कारने पेट घेतला.

यावेळी मद्यधुंद कारचालक स्वत:ची सुटका करून घेऊ न शकल्यामुळे जागीच होरपळून ठार झाला.

अधिक माहिती अशी की, रस्त्याच्या कडेला पार्क करून ठेवलेल्या वाहनांना महाराष्ट्र नोंदणीकृत कारने जोरात धडक दिली. त्याचवेळी या कारने पेट घेतला. आगीचा भडका उडून अपघातग्रस्त कारचालकाचा जागीच भाजून मृत्यू झाला.

अपघातग्रस्त कारसह रस्त्याच्या बाजूने पार्क केलेल्या वाहनांनाही आग लागल्याने चार गाड्यांचे मोठे नुकसान झाले. मृत कारचालकाचे नाव सुजय सुर्लकर (33) असे असून तो ठाणे (मुंबई) येथील रहिवासी आहे.

Car Accident at Tonca-Panjim
Goa Government : स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांसाठी रोजगार योजनेच्या मुदतीत वाढ; मुख्यमंत्री म्हणाले...

कारमध्ये सापडलेल्या ओळखपत्रावरून मृताची ओळख पटली. हा अपघात कारचालक मद्याच्या नशेत असल्याने झाल्याचे पोलिसांनी मिळवलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून निष्पन्न झाले आहे.

टोंक-करंझाळे येथे एका गाडीने पेटत घेतल्याचा कॉल अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला पहाटे 4 च्या सुमारास एका महिलेने केला. त्वरित दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असता, गाडीला लागलेली आग भडकली होती.

या कारमुळे रस्त्यालगत पार्क केलेल्या दोन स्वीफ्ट व एक सेंट्रो अशा तीन वाहनांच्या मागील बाजूने पेट घेतला होता. आणखीही काही गाड्या रांगेत पार्क केल्या होत्या. अपघातग्रस्त कारची आग विझवण्यापूर्वी ती पूर्णत: जळाली होती, तर अर्धवट जळणाऱ्या इतर तीन वाहनांंची आग पाण्याच्या फवाऱ्याने आटोक्यात आणण्यात आली.

अपघातग्रस्त कारमध्ये चालकाच्या आसनावर एक व्यक्ती होरपळलेल्या स्थितीत आढळली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी जवानांना कारची दारे तोडावी लागली. सुजय सुर्लकर याचा मृतदेह गोमेकॉत उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून त्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Car Accident at Tonca-Panjim
Mopa Airport:...आणि मोपा विमानतळावरच झाली लग्नाला सुरूवात झाली, पाहा फोटो

यासंदर्भात अग्निशमन दलाचे अधिकारी रूपेश सामंत म्हणाले की, अग्निशमन दलाला आगीची माहिती थोडी उशिराच मिळाली. त्यामुळेच अपघातग्रस्त कार आग विझवण्यापूर्वीच खाक झाली होती.

आगीचा भडका मोठा असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यात अडचणी आल्या. आगीच्या ज्वाळांमुळे कारमध्ये कोणी आहे का, याची माहिती मिळत नव्हती. मात्र, जेव्हा आग आटोक्यात आणली, तेव्हा एक व्यक्ती चालकाच्या सीटवर जळालेल्या स्थितीत होती. त्याची ओळख पटण्यापलीकडे होती.

गाडीतील साहित्याचा शोध घेतला असता वाशी-नवी मुंबई येथील नवी मुंबई स्पोर्टस् असोसिएशनचे ओळखपत्र सापडले. मृत सुजय सुर्लकर हा या असोसिएशनचा सदस्य आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुजय हा मूळचा सांगे येथील असून गेली अनेक वर्षे कुटुंबींयासह ठाणे (मुंबई) येथे स्थायिक आहे. तो व्यावसायिक असून कुंडई येथे वॉटर प्रूफिंगसाठी लागणाऱ्या रसायनांचा पुरवठा कऱण्याचा त्याचा व्यवसाय आहे.

त्याच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती दिल्यानंतर ते गुरुवारी संध्याकाळी गोव्यात पोहचले. सुजयच्या मृतदेहाची उद्या (17मार्च) उत्तरीय तपासणी केली जाणार आहे. शवचिकित्सेनंतरच या अपघातामागील कारण व आग कशी लागली, याचा उलगडा होईल, असे मत पणजीतील पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

घटनाक्रम असा...

  • टोंक - करंझाळे येथील एका बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये सुजय सुर्लकर रात्री उशिरा दीड वाजेपर्यंत मद्य घेत बसला होता.

  • तो जाण्यासाठी निघाला, तेव्हा त्याच्यात उभे राहण्याचीही ताकद नव्हती.

  • तीनवेळा तो उठला; पण तोल जात असल्याने खुर्चीवर बसला.

  • त्यानंतर तो रेस्टॉरंटमधून निघून आपल्या कारमध्ये बसला.

  • ही कार फुल्ली ऑटोमेटिक असून ती सुरू झाल्यानंतर सुजयचे या गाडीवर नियंत्रण नव्हते.

  • ही कार हळूहळू पुढे सरकत काही अंतरावर थांबली.

  • कार सुमारे अडीच तास तशीच चालू स्थितीत उभी होती.

  • गाडीमधील सुजयची काहीच हालचाल नव्हती.

  • ही चालू स्थितीतील कार पहाटे ४.१५ च्या सुमारास पुढे आली.

  • तिने पार्क केलेल्या वाहनांना धडक दिली.

  • या कारचे इंजिन सुमारे साडेतीन तास सुरूच राहिल्याने ते तापलेले होते.

  • त्यामुळे धडक देताच अगोदर धूर येऊ लागला आणि नंतर आग भडकली.

  • मद्याच्या नशेत सीट बेल्ट लावलेल्या स्थितीत सुजयला याचे काहीच भान नव्हते.

  • कारमध्येच त्याचा भाजून मृत्यू झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com