गोव्यासह देशभरात आज होणार 'कोरोना लसीकरणाची' रंगीत तालीम

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 2 जानेवारी 2021

कोरोना लसीकरण मोहीम लवकरच सुरू होणार असल्याच्या पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने या मोहिमेच्या अंमलबजावणीची आज देशभरात रंगीत तालीम घेण्याची तयारी केली आहे.

नवी दिल्ली :  कोरोना लसीकरण मोहीम लवकरच सुरू होणार असल्याच्या पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने या मोहिमेच्या अंमलबजावणीची आज देशभरात रंगीत तालीम घेण्याची तयारी केली आहे. आज ही रंगीत तालीम होईल, असे आरोग्य मंत्रालयाकडून कळते. या आधी पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्रप्रदेशात रंगीत तालीम झाली होती. या चारही राज्यांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर देशभरात रंगीत तालीम घेण्याचा निर्णय सरकारने केला आहे. कोरोना लस वापरासाठी मंजुरी मिळताच देशभरात लसीकरण सुलभतेने करता यावे यासाठी ही रंगीत तालीम असून यामध्ये सर्व राज्यांच्या राजधानीच्या शहरात तीन केंद्रांवर ही मोहीम राबविली जाईल. अर्थात, शहरी भागाप्रमाणेच राज्यामधील दुर्गम भागातील आणि आरोग्य सुविधा समाधानकारक नसलेल्या जिल्ह्यांमध्येदेखील लसीकरणाची पूर्वतयारी केली जाईल. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लसीकरणाच्या प्रस्तावित रंगीत तालमीसाठी राज्यांसमवेत बैठक घेतली. 

अशी होणार रंगीत तालीम

लस वितरणासाठी प्रत्येक राज्यामध्ये किमान तीन केंद्रे निश्चित केली जातील, याठिकाणी लाभार्थींना नोंदणी करता येईल. तत्पूर्वी सर्वसाधारण मोहिमेप्रमाणेच ही रंगीत तालीम घेतली जाणार असून केंद्राच्या दिशानिर्देशांनुसार राज्यांना दोन शहरे निवडावी लागतील. या शहरांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस पोहोचविणे, ही लस रुग्णालयांपर्यंत नेऊन डोस देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यामध्ये शीतपेट्यांमध्ये लशीची साठवणूक, लाभार्थींची नोंदणी, लस दिल्यानंतरचा वैद्यकीय सल्ला या प्रक्रियांचाही समावेश असेल. 

गोव्‍यातही लसीकरण सराव सज्जता

देशभरात ज्याप्रमाणे कोरोना लसीची सराव चाचणी घेण्यात येणार आहे, तशीच गोव्यातही होणार आहे. आरोग्य खात्याने सराव चाचणीसाठीची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात लवकरच एक बैठक तातडीने घेण्यात येणार आहे. तशा सूचना संबंधित आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आल्‍या आहेत. ही चाचणी आणि यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना आणि नियम सर्व आरोग्य केंद्रांना कळविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य खात्यातून मिळाली.

संबंधित बातम्या