कोरोना काळात फोटोग्राफर झाले बेकार!

वार्ताहर
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

मंगलकार्ये नसल्याने ‘ऑर्डर्स’ बंद, रोजीरोटीचा सवाल ः स्वयंरोजगार करणाऱ्यांची गोची

मडकई; कोरोना महामारीमुळे स्वयंरोजगार करणाऱ्यांची बरीच गोची झाली असून संसर्गाच्या भीतीने लग्न समारंभ, मुंज, वाढदिन तसेच इतर सोहळेच रद्द अथवा सीमित झाल्याने अशा मंगल कार्यांवर अवलंबून असलेल्या छायाचित्रकारांचा धंदाच गायब झाला आहे. पूर्वीप्रमाणे कामाच्या ‘ऑर्डर्स’ नसल्याने आता कमवायचे काय, आणि खायचे काय, असा सवाल निर्माण झाल्याचे फोंड्यातील बहुतांश छायाचित्रकारांनी या प्रतिनिधीशी आपली मते व्यक्त करताना सांगितले.

नोकरी नसल्याने छंद असलेल्या बऱ्याच जणांनी फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीमधूनच आपला व्यवसाय सुरू केला, आणि पुढे नेला. विशेषतः लग्न तसेच वाढदिन, एखाद्या कंपन्यांचे कार्यक्रम किंवा घरगुती सोहळ्यांवेळी फोटोग्राफरांची गरज भासते. सुबक सुंदर फोटो काढून त्या मंगल क्षणांची आठवण जोपासण्याचा प्रयत्न फोटोग्राफीतून होत असल्याने लोक हे क्षणही फोटोद्वारे जपून ठेवतात. त्यामुळेच अशा कार्यक्रमांना फोटो घेऊन सर्वांत पुढे  असलेल्या  छायाचित्रकारांची रोजीरोटीही चालते. 

सध्या कोरोनामुळे लग्न तसेच इतर सोहळेच सीमित झाले आहेत. पूर्वीच्यासारखा बडेजाव कुठे दिसत नाही. मागच्या काही दिवसांत काही ठिकाणी लग्ने झाली, पण आपले कुटुंब, सगेसोयरे आणि काही मित्रांपुरते मर्यादित ठेवूनच ही मंगलकार्ये झाली. 

वाढदिन सोहळ्यांचेही तेच झाले आहे. वाढदिन सोहळ्यात लोकांची उपस्थिती मोठी झाली आणि कदाचित कोरोनाचा संसर्ग झाला तर, या भीतीपोटीच लोक कार्यक्रम करायला धजावत नाही. त्यातच सरकारी आदेशाप्रमाणे हे कार्यक्रमही आता सीमित झाल्याने केवळ नावापुरते ते साजरे केले जात आहेत, त्यामुळे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीला अशा कार्यक्रमात स्थानच नसल्याने बहुतांश फोटो स्टुडिओ बंदच ठेवण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या