सरकारच्या आशीर्वादामुळेच हणजूण येथे पार्टी

अवित बगळे
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा आरोप

पणजी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे व खासदार विनय तेंडुलकर यांच्या आशिर्वादाशिवाय परवा हणजूण येथे विदेशी पर्यटकांची पार्टी आयोजित केलीच जाऊ शकत नव्हती, असा घणाघाती आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला आहे.
ते म्हणाले, या पार्टीचे मुख्य आयोजक कपिल झवेरी यांनी त्याचसाठी या तीन राजकारण्यांची भेट घेतली होती. (भेटीची छायाचित्रे त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली) गोव्यातील भाजप सरकारची नशा लवकर उतरली नाही तर पुढची पिढी अमली पदार्थ व्यवसायाने संपेल. रेव्ब पार्टीत अर्धनग्न नृत्य सादर करण्यासाठी बोलविण्यात येणाऱ्या रशियन मुलींना आणण्याची एक एजन्सी असून त्या एजन्सीचे सुत्रदार हे सत्ताधारी गोटात आहेत.
कळंगुटचे माजी आमदार आग्नेल फर्नांडिस म्हणाले, झवेरीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व खासदार विनय तेंडुलकर यांचे गोडवे गाणारे तसेच सरकारच्या सहकार्या बद्दल धन्यवाद देणारे लिखाण समाजमाध्यमांवर केले आहे यावरून पार्टीला कोणाचा आशिर्वाद होता हे दिसून येते. ते वेगळे आणखीन काही सांगण्याची गरज नाही.
चोडणकर म्हणाले, तत्कालीन नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी जारी केलेले भ्रष्टाचाराला चालना देणारे १६- ब चे परिपत्रक अजूनही मागे घेतलेले नाही व लोकांची सतावणुक व भ्रष्टाचार सुरूच आहे. नवीन प्रकल्पांतील प्रत्येक सदनिकेसाठी तीस हजार रुपये तर दुकानांसाठी ४० हजार रुपये मंत्र्यांना द्यावे लागतात, अशी चर्चा नागरीकांत आहे, त्याची चौकशी करून सत्य सर्वांसमोर आणावे.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदी विश्वजित राणे वा मायकल लोबो यांची निवड करावी या गोवा फॉरवर्डचे आमदार विनोद पालयेकर यांच्या मागणीवर बोलताना तो राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड प्रतिम कुतिन्हो यांनी स्वातंत्र्यदिन शुभेच्छा देताना पाकव्याप्त काश्मीरविरहीत नकाशा वापरल्याबद्दल चोडणकर यांनी आज जनतेची माफी मागितली.

संबंधित बातम्या