भाजपमुळे गोव्यातील कष्टकरी समाज दारिद्रय भोगत आहे : संकल्प आमोणकर

भाजपचे "गरीब कल्याण संमेलन" हे मोदी-सावंतांच्या नाकर्तेपणाचे प्रमाणपत्र असल्याची बोचरी टिका कॉंग्रेस विधीमंडळ गटाचे उपनेते तथा मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केली.
भाजपमुळे गोव्यातील कष्टकरी समाज दारिद्रय भोगत आहे : संकल्प आमोणकर
BJP vs Congress DisputeDainik Gomantak

पणजी : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील असंवेदनशील, बेजबाबदार आणि भ्रष्ट भाजप सरकारने गोवा राज्याला आर्थिक दिवाळखोरीत ढकलून, आर्थिक आणीबाणीची परिस्थिती आणल्याने आज कष्टकरी समाज दारिद्रय भोगत आहे. भाजपचे "गरीब कल्याण संमेलन" हे मोदी-सावंतांच्या नाकर्तेपणाचे प्रमाणपत्र असल्याची बोचरी टिका कॉंग्रेस विधीमंडळ गटाचे उपनेते तथा मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केली.

कॉंग्रेस भवनात पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष तथा कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता व सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फेर्नांडिस यांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कॉंग्रेसच्या चारही आमदारानी भाजप सरकारच्या ढेपाळलेल्या प्रशासनावर जोरदार टिका करीत, आगामी विधानसभा अधिवेशनात गोमंतकीयांचे प्रश्न उठविण्याचा निर्धार जाहिर केला.

BJP vs Congress Dispute
दक्षिण गोव्यात लोकसभा ‘निवडणुकीचे वेध’; काँग्रेस गोंधळात

विधानसभा निवडणुकीत पुर्ण बहुमत न मिळालेल्या भाजप सरकारने मागील तीन महिन्यात जनतेच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही. भाजपचे मंत्री एकामेकांवर कुरघोडी करण्यात आणि विरोधकांची सतावणूक करण्यात व्यस्थ असताना, मुख्यमंत्री आपली खुर्ची वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत.

गोव्यात भाजपने आयोजित केलेले गरीब कल्याण संमेलनहे सरकारच्या अपयशावर पांघरुण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न होता. सदर संमेलनाला दिलेल्या नावातच भाजप सरकारने राज्यात भरभराट करण्याऐवजी दारिद्रय आणले, हे स्पष्ट होत असल्याचे संकल्प आमोणकर म्हणाले.

आज राज्याची तिजोरी रिकामी झालेली असताना, बेजबाबदार भाजप सरकारने नविन राजभवनाची पायाभरणी केली. सरकार प्रत्येक महिन्यात कर्ज काढून कर्माचाऱ्यांना पगार देत आहे. ज्येष्ठ नागरीक, गृहिणी, विधवा, दिव्यांग, खलाशी तसेच इतर सामाजिक योजनांच्या लाभार्थ्यांना सहा-सात महिने अर्थसहाय्य मिळत नाही.

क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक गरजूंना मागील पाच वर्षे अर्थसहाय्य मिळालेले नाही. आता राज्यावरील कर्ज 27000 कोटी झाले आहे. प्रत्येक गोमंतकीयाच्या डोक्यावर आज 1.80 लाखांचे कर्ज आहे, असे कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी सांगितले.

जुने गोवे येथील वारसा स्थळात उभारलेले बेकायदा बांधकाम पाडण्यास सरकार टाळाटाळ करीत आहे. नगर नियोजन खात्याचे कलम 16 -ब रद्द करण्याची सरकारची तयारी नाही. राज्यातील ऐतिहासिक व वारसा स्थळांची जपणूक करणे सरकारला जमत नाही.

गोवा मुक्तीच्या 60 व्या वर्षी केवळ प्रसिद्धीसाठी कार्यक्रम आयोजित करुन त्यावर कोटी रुपयांची उढळपट्टी करणाऱ्या भाजप सरकारला मडगावचे लोहिया मैदानही ऐतिहासिक स्थळ म्हणउण अधिसुचीत करणे जमले नाही.

यावरुनच भाजपचे बेगडी देशप्रेम उघड होते. सरकारने उत्खनन करुन इतिहास शोधण्यापेक्षा चांदर येथील पुरातन महादेव मंदिराच्या पुरातन दगडांची होत असलेली विक्री थांबवावी, असा सल्ला सांताक्रुझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी दिला.

आज डिजिटल शिक्षण पद्धत सुरू करण्याची भाषा सरकार करीत आहे. पंरतु, शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके देणे सरकारला जमत नाही. खाण व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारकडे उपाय नाही. जिएसटीचा केंद्राकडून मिळणारा परतावा बंद झाल्यानंतर महसूल प्राप्तीचा कसलाही प्रस्ताव सरकारकडे नाही.

आज राज्यात इंधनाच्या दराने उच्चांक गाठला आहे. महागाईने लोकांचे कंबरडे मोडले आहे. बेरोजगारीने युवा वर्ग हवालदिल झाला असून, ड्रग्स व्यवसाय राज्यात फोफावत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढेपाळली आहे. सरकारने यावर उपाययोजना काढणे गरजेचे असल्याचे केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता म्हणाले.

आगामी विधानसभा अधिवेशनात तारांकीत व अतारांकीत प्रश्न, शुन्य प्रहर, लक्षवेधी सुचना, खासगी ठराव यांच्या माध्यमातुन आम्ही सरकारला जाब विचारणार असून, कॉंग्रेस पक्षाने विधानसभेत व बाहेर सरकारला घेरण्याची रणनिती आखल्याचे चारही आमदारांनी सांगितले.

विधानसभेतील इतर विरोधी पक्षांचे आमदार तसेच अपक्ष आमदारांशी संपर्क साधून आम्ही गोमंतकीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे सहकार्य घेणार असल्याचे कॉंग्रेस आमदारानी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com