उपसभापतींचा मुलगा अडचणीत 

fake
fake

पणजी

अव्वल कारकून पदासाठी बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी उपसभापतींचा मुलगा रेमंड फर्नांडिस याच्‍याविरुद्ध सादर केलेल्‍या तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याचा आदेश गोवा राजभवनमधून पाठविलेल्या पत्रात नमूद केला आहे. त्यामुळे याप्रकरणी फर्नांडिस हे अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
बोगस पदवी प्रमाणपत्रामुळे रेमंड फर्नांडिस याला अव्वल कारकून पदासाठी निवड होऊनही ते गमावावे लागले होते. त्याच्या या बोगस पदवीप्रकरणी गुन्हा नोंदवून कारवाई केली जावी, अशी विनंती समाज कार्यकर्ते ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन केली होती. रेमंड याने सादर केलेली बीएची पदवी बोगस असल्याचे आढळून आल्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या १६ जूनला त्याची अव्वल कारकून पदासाठीची झालेली निवड रद्द केली होती. 
अव्वल कारकून पदासाठी रेमंड फर्नांडिस याने बीए पदवी असलेले प्रमाणपत्र अर्जासोबत जोडले होते. ही पदवी बोगस असल्याचा दावा करीत ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. या पदासाठी १६ जणांची निवड झाली होती, त्यामध्ये रेमंड फर्नांडिस याचेही नाव होते. या तक्रारीमुळे ही प्रक्रिया स्थगित ठेवत रेमंड याच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी सुरू झाली होती. 
शैक्षणिक पात्रतेच्‍या केलेल्‍या चौकशीत रेमंड फर्नांडिस याचे पदवी प्रमाणपत्र बोगस असल्याचे गोवा विद्यापीठाने कळविले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी १६ पैकी उर्वरित निवड झालेल्या १५ उमेदवारांना नियुक्तिपत्रे दिली होती, तर रेमंड फर्नांडिस याचे नाव या निवड यादीतून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून त्याची ही निवड रद्द का केली जाऊ नये, याबाबत उत्तर देण्यास संधी दिली होती. याला उत्तर देताना त्याने अव्वल कारकून पदासाठी निवड झाल्यानंतर ती रद्द करता येत नाही, असे म्हटले होते. 
रेमंड हा मिरामार येथील रोझरी स्कूलचा विद्यार्थी होता. २००१ मध्ये तो दहावीच्‍या परीक्षेत नापास झाला होता, असा दावा ॲड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी केला होता. त्याची भारतीय शिक्षा परिषदची पदवी बोगस आहे. कारण, या परिषदेला विद्यापीठाची मान्यता नाही. त्यामुळे तो या पदासाठी पात्र ठरत नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. रेमंड याच्याविरुद्ध कठोर कारवाई केल्यास इतरांतही संदेश जाईल व भविष्यात शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या बाबतीत बनवेगिरी करण्याचे किंवा बोगस प्रमाणपत्र सादर करण्याचे कोणी धाडस करणार नाही, असे तक्रारीत रॉड्रिग्ज यांनी म्हटले होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com