उपमुख्यमंत्र्यांचा वाढदिवस शेतकऱ्यांसोबत

Dainik Gomantak
रविवार, 10 मे 2020

नेत्रावळी येथील शेतकरी हर्षद देसाई यांच्या सोबत कृषी मंत्र्यांनी जेवण घेतले. तसेच त्यांच्या शेतीलाही मंत्र्यांनी भेट दिली. नेत्रावळीचा कापणीविना राहिलेल्या ५८ पैकी एका ऊस माळ्याचीही यावेळी त्यांनी पाहणी केली.

पणजी
उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी आपल्या वाढदिनी शेतकऱ्यांशी दिवसभर संवाद साधला. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकत त्यांनी त्यावर उपाययोजना करत हा वाढदिवस शेतकऱ्यांच्या सोबतच साजरा केला. कृषीमंत्र्याचा वाढदिवस कसा हवा याचे उदाहरण त्यांनी कृतीतून घालून दिले आहे.
कवळेकर यांनी कृषी उत्पन्नात राज्याला स्वयंपूर्ण बनवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांनी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांपर्यंत पाठवणे सुरु केले आहे. त्यांनी राज्य शेती प्रधान बनावे ह्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न चालविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आपल्या वाढदिवशी कृषीमंत्र्यांनी  दक्षिण गोव्यातील शेतकऱ्यांचे मळे गाठले व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यावर चर्चाही केली. 
एक दिवस शेतकऱ्यांसोबत ही या मागची संकल्पना होती. कोविड - १९ ची टाळेबंदी पाळून वाढदिवसानिमित्त घरी किंवा इतरत्र भेटून शुभेच्छा देण्याचे टाळावे असेही आवाहन त्यांनी केले होते. शेतकऱ्याशी थेट संवाद साधून, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे मदत करता येईल हा या भेटींमागचा उद्देश होता.
सकाळ ते संध्याकाळ चाललेल्या या भेटीमध्ये कृषीमंत्ंर्यासोबत कृषी खात्याचे संचालक नेव्हिल आफोंसो, फलोत्पादन महामंडळाचे कार्यकारी संचालक संदीप फळदेसाई, कृषी अधिकारी सत्यवान देसाई, क्षेत्रीय कृषी अधिकारी शिवराम गावकर, गौरी प्रभुदेसाई, संदेश राऊत देसाई आदी होते. 
खोल भागात आधी खोल मिर्ची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर, खोल भागातच असलेल्या पॉलीहाऊस चालविणाऱ्या होतकरू शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. सध्या ऑर्किड फ्लॉवर व्यवसायाला टाळेबंदीमुळे बऱ्यापैकी फटका बसलेला असून व्यावसायिकांचे बऱ्यापैकी नुकसान होत आहे. पॉलीहाऊस चालू ठेवायला कमीतकमी ५० हजार महिना खर्च होत असतो व त्यासाठी सरकारने मदत करावी असे या शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांना सांगितले. "कृषी खात्याने हा विषय ह्याच्या आधीच लक्षात घेऊन, ऑर्किड उत्पादकांचे सर्वेक्षणही केले आहे. सरकार लवकरच याच्यावर निर्णय घेणार", असे कृषीमंत्री यावेळी म्हणाले. 
काणकोण तालुक्यातील गावडोंगरी भागातील, सातुर्ली या भागातील शेतकऱ्यांनी ३५ वर्षांनंतर जमीन लागवडीखाली आणली. या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना शाबासकी देण्यासाठी कृषी मंत्र्यांनी सातुर्लीला भेट दिली. तसेच या भागातील शेतकऱ्यांनी पारंपरिक ऊस लागवड सोडून, वैकल्पिक पिकाचा अवलंब करून अगदी पहिल्याच प्रयत्नात चिटकी मिटकी, भेंडी आदी भाज्यांचे पीक घेतले. 
नेत्रावळी येथील शेतकरी हर्षद देसाई यांच्या सोबत कृषी मंत्र्यांनी जेवण घेतले. तसेच त्यांच्या शेतीलाही मंत्र्यांनी भेट दिली. नेत्रावळीचा कापणीविना राहिलेल्या ५८ पैकी एका ऊस माळ्याचीही यावेळी त्यांनी पाहणी केली. त्यानंतर कुर्डी वाडे कृषी उत्पादक सहकारी पथ संस्थेलाही त्यांनी भेट दिली. हल्लीच या कापणी न झालेल्या ऊस उत्पादकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी कृषी मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले होते. 
केप्यात व सासष्टी तालुक्यात भात कापणी यंत्राची शेतकी मंत्र्यांनी यावेळी पाहणी केली. शेतकऱ्यांनी भटकी गुरे शेत खात असतात व त्यासाठी कुंपणाची गरज बोलून दाखवली. कृषी मंत्र्यांनी यावेळी कृषी संचालकांना खात्याच्या योजने अंतर्गत हे काम तातडीने हाती घ्यायचे दिशानिर्देश दिले. 

इ-कृषी संपर्क अभियानाची सुरुवात
राज्यात टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यापर्यंत अधिकाधिक माहिती पोचविण्यासाठी कृषीमंत्र्यांनी व्हॉटसएप ग्रुप करण्याचे सुचविले होते. त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात किमान एक, असे हे ग्रुप तयार करण्यात आले असून, संबंधित क्षेत्रीय अधिकारी, खात्याचे उच्य अधिकारी आणि स्थानिक शेतकरी इथे असणार आहेत. खात्याच्या विविध योजना, शेतकऱ्यांना दृकश्राव्य माध्यमातून नविन तंत्रज्ञानाची माहिती, वेळोवेळी सुचना शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी ह्या ग्रुपचा वापर करण्यात येणार आहे. इ कृषी संपर्क या नावाने ह्या योजनेचा शुभारंभ शेतकी मंत्र्याच्या हस्ते करण्यात आला. 
८ वेगेवेगळ्या शेतकी विषयांची माहिती देणारे पत्रक ही यावेळी प्रसिद्ध करण्यात आले. सर्व क्षेत्रीय कृषी कार्यालयांतून हे पत्रक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध राहणार आहे. 

संबंधित बातम्या