२.४ दशलक्ष टन खनिजाचा ई लिलाव

Dainik Gomantak
बुधवार, 20 मे 2020

आपत्ती व्यवस्थापनाखाली प्रत्येक खात्याने कधीपर्यंत कामे पूर्ण करायची आहे, हे लक्ष्यही निश्चित करण्यात आले आहे. ठरवलेल्या तारखेपर्यंत ही कामे झालेली आहेत की नाहीत, याचाहा आढावा घेतला जाणार आहे

पणजी

२७ मे रोजी २.४ दशलक्ष टन खनिजाचा ई लिलाव पुकारण्यात येणार आहे. सध्या खाणींवरील खनिजमाल बार्जमधून बोटीत चढवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात खाणींतील पाण्याचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी माजी खाणपट्टाधारकांनीच घ्यावी, अशी सूचना त्यांना खाण खाते करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पर्वरी येथे दिली.
राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, पावसाळ्यात कोणत्या खात्याने काय काळजी घेतली पाहिजे. कोणती कामे हाती घेतली पाहिजे. गेल्यावर्षी पूर आल्‍यानंतर कोणत्या पद्धतीने मदत दिली होती. ती देताना कोणत्या अडचणी आल्या होत्या. त्या दूर कशा करता येतील, यावर चर्चा झाली. यंदा पावसाळ्यात आपत्ती, पूर आला तर त्याला तोंड कसे द्यायचे, याचे नियोजन करण्यात आले. आधीच राज्यात ‘कोविड-१९’ची महामारी आहे. त्यातच नैसर्गिक आपत्ती आली, तर त्याचा ताण सरकारी यंत्रणेवर आल्यास योग्य नियोजन केल्यास सुरळीतपणे जनतेला मदत करता येऊ शकते. त्यासाठी नियोजनाच्या अनुषंगाने आज चर्चा करण्यात आली.

आपत्ती व्‍यवस्‍थापन कामांसाठी लक्ष्‍य निश्‍चिती
आपत्ती व्यवस्थापनाखाली प्रत्येक खात्याने कधीपर्यंत कामे पूर्ण करायची आहे, हे लक्ष्यही निश्चित करण्यात आले आहे. ठरवलेल्या तारखेपर्यंत ही कामे झालेली आहेत की नाहीत, याचाहा आढावा घेतला जाणार आहे. राज्य कार्यकारी समितीत दैनंदिन स्वरुपाचा आढावा घेतला जात आहेच, त्याशिवाय हे काम आहे. मळा येथे पाणी साचते. त्यावर जलसंपदा खाते उपाय काढणार आहे, असे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आमदार आतानासिओ मोन्सेरात यांच्यासह त्यासाठी बैठक बोलावली आहे. पाणी उपशासाठी यंदा नवीन पंप विकत घेण्यात येत आहे. पावसाळ्यात मदतीसाठी कर्मचाऱ्याच्या ये जा करण्यासाठी गेल्यावर्षी बोटी नव्हत्या त्यामुळे दोन छोट्या बोटी विकत घेण्यास सांगितले आहे. दोन्ही जिल्हाधिकारी जिल्हा पातळीवरील तयारीचा आढावा घेत आहेत.
गेल्यावर्षी पूर आलेल्या ठिकाणी आता काय स्थिती आहे याची अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. गेल्यावर्षी तिळारी धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्याने पूर आला होता. आता महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात राहून नदीतील पाण्याच्या पातळीवर नजर ठेवण्यात येणार आहे. त्यांनी अचानक पाणी कालव्यात सोडू नये यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. पावसाळ्यात विजेची समस्या कोणत्याही भागात निर्माण झाली, तर त्यावर मात करण्यासाठी मोबाईल ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करण्याची सूचना वीज खात्याला केली आहे. पावसाळ्‍यात संसर्गजन्य आजार पसरू नयेत यासाठी धूर फवारणीसह जे काही उपाय हाती घ्यायचे आहेत त्याची तयारी आरोग्य खात्याने केली आहे. आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी बैठकीत त्याविषयी माहिती दिली आहे.

संबंधित बातम्या