एफसी गोवासमोर ईस्ट बंगालचा धोका

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

एफसी गोवा आणि ईस्ट बंगाल यांच्यातील सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल.

पणजी: एफसी गोवा आणि ईस्ट बंगाल यांच्यात सध्या सातव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात आठ गुणांचा फरक आहे, तरीही त्यांच्यात होणारी लढत एकतर्फी नसेल. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेस पात्र ठरलेल्या संघासमोर धोका कायम असेल.

एफसी गोवा आणि ईस्ट बंगाल यांच्यातील सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळला जाईल. एफसी गोवाने 13 लढतीत पाच विजय, पाच बरोबरी व तीन पराभवासह 20 गुणांची कमाई केली आहे. रॉबी फावलर यांच्या मार्गदर्शनाखालील ईस्ट बंगालने 13 लढतीत दोन विजय, सहा बरोबरी व पाच पराभव या कामगिरीसह 12 गुण प्राप्त केले आहेत.

आघाडी वाढविण्याचे चर्चिल ब्रदर्सचे ध्येय सलग चार सामने अपराजित, ट्राऊ...

एफसी गोवा संघ सलग सहा सामने अपराजित आहे. ईस्ट बंगालनेही सुरवातीच्या खराब निकालानंतर कामगिरी कमालीची उंचावली आहे. सहा सामने अपराजित राहिल्यानंतर त्यांना मागील लढतीत मुंबई सिटीकडून एका गोलने निसटती हार पत्करावी लागली. एफसी गोवास मागील दोन लढतीतून फक्त दोन गुणांचीच कमाई करता आली. एटीके मोहन बागान व केरळा ब्लास्टर्सविरुद्ध गोव्यातील संघाला बरोबरीवर समाधान मानावे लागले. त्यामुळे ईस्ट बंगालविरुद्ध पूर्ण तीन गुणांची कमाई करण्यासाठी एफसी गोवा संघ इच्छुक असेल.

‘‘आमच्यासाठी उद्याचा सामना खूप महत्त्वाचा आहे. अपेक्षित निकाल नोंदवून उद्दिष्टाच्या दिशेने एक पाऊल टाकण्याचेच नियोजन आहे. आम्ही फक्त ईस्ट बंगालविरुद्धच्या सामन्यावरच लक्ष केंद्रित केले आहे,’’ असे एफसी गोवाचे सहाय्यक प्रशिक्षक क्लिफर्ड मिरांडा यांनी गुरुवारी सांगितले. मुख्य प्रशिक्षक ज्युआन फेरांडो निलंबनामुळे शुक्रवारी मैदानावर एफसी गोवाच्या डगआऊटमध्ये नसतील. केरळा ब्लास्टर्सविरुद्ध रेड कार्ड मिळालेला बचावपटू इव्हान गोन्झालेझ ईस्ट बंगालविरुद्धच्या लढतीत निलंबित असेल, तसेच मध्यरक्षक ब्रँडन फर्नांडिसही दुखापतीमुळे अनुपलब्ध असेल, अशी माहिती क्लिफर्ड यांनी दिली. मागील लढतीत दुखापतग्रस्त झालेला बचावपटू जेम्स डोनाकी याची तंदुरुस्ती एफसी गोवासाठी महत्त्वाची असेल.

आदिल खेळण्यास सज्ज

यंदा आयएसएल मोसमात हैदराबाद एफसीकडून पाच सामन्यांत फक्त 34 मिनिटे खेळलेला भारतीय संघातील अनुभवी बचावपटू आदिल खान एफसी गोवातर्फे खेळण्यास सज्ज झाला आहे. या गोमंतकीय खेळाडूस लोनवर कराबद्ध करण्यात आले आहे. 32 वर्षीय आदिल आतापर्यंत आयएसएल स्पर्धेत ६१ सामने खेळला आहे. शुक्रवारी तो प्रथमच एफसी गोवाच्या जर्सीत खेळण्याची शक्यता आहे. ‘‘मोसमाच्या सुरवातीस दुखापतीमुळे खेळू शकलो नाही, त्यानंतर हैदराबाद संघाचा जम बसला होता व मला संधीसाठी वाट पाहावी लागली. तेथे खेळणे अशक्य असल्याची जाणीव झाल्यानंतर एफसी गोवातर्फे खेळण्यासाठी परवानगी मागितली. गोव्यातील या नावाजलेल्या संघातर्फे खेळण्याचे स्वप्न आयएसएलच्या सुरवातीपासून होते. आता त्यांच्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे,’’ असे आदिल म्हणाला. आयएसएल स्पर्धेत खेळण्यास मिळत नसल्याने भारतीय संघात स्थान मिळविण्याबाबत चिंता सतावत होती ही कबुली त्याने यावेळी दिली.

 

दृष्टिक्षेपात...

- पहिल्या टप्प्यात 10 खेळाडूंसह खेळताना ईस्ट बंगालची एफसी गोवाशी 1-1 गोलबरोबरी

- मागील 6 लढतीत एफसी गोवाचे 3 विजय, 3 बरोबरी

- 2 विजय व 4 बरोबरीनंतर मागील लढतीत ईस्ट बंगाल पराजित

- एफसी गोवाचे 18, तर ईस्ट बंगालचे 11 गोल

- प्रतिस्पर्ध्यांचे ईस्ट बंगालवर 17, तर एफसी गोवावर 13 गोल

संबंधित बातम्या