
Agriculture News भारतीय संशोधकांनी भाताची एक नवीन जात विकसित केली आहे. या भाताच्या जातीची बारमाही शेती होणार असल्याचा दावा आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू कृषी विद्यापीठाने काळ्या तांदळाची एक नवीन जात शोधून काढली आहे.
‘कवुनी सीओ57’ असे या नवीन जातीचे नाव असून या जातीच्या काळ्या तांदळाची उत्पादनक्षमता इतरांच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा आहे.
विशेष म्हणजे या जातीच्या तांदळात अधिक पोषक घटक असल्याने आरोग्याच्या दृष्टीनेदेखील ही जात फायदेशीर राहणार आहे. तसेच हा तांदूळ मधुमेह रुग्णांच्या आहारासाठी पौष्टिक मानला जातो.
तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या या काळ्या भाताच्या जातीपासून हेक्टरी 46 क्विंटल इतके उत्पादन मिळणार आहे. विशेष म्हणजे या जातीच्या पिकाची लागवड कोणत्याही हंगामात करता येणे शक्य असल्याचे सांगितले जात आहे.
या नव्याने विकसित झालेल्या जातीसंदर्भात तामिळनाडू कृषी विद्यापीठाच्या कुलपती गीतालक्ष्मी यांनी दिलेल्या बहुमूल्य माहितीनुसार, ही जात इतर जातीच्या तुलनेत अधिक उत्पादन देणारी असून या जातीला बारमाही उत्पादित करणे शक्य होणार आहे.
ही जात रोवणी केल्यानंतर 130 ते 135 दिवसांत काढणीसाठी तयार होत असते. इतर जातीच्या तुलनेत या जातीचे पीक अल्पकालावधीत काढण्यासाठी तयार होते. एवढेच नाही तर ही नव्याने विकसित झालेली जात रोगप्रतिकारक आहे. अनेक रोगांशी लढण्यास ही जात सक्षम आहे.
योजनेचा फायदा घ्यावा
ज्योती व गोवा धान हे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. हे बियाणे 50 टक्के अनुदानावर दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेचा फायदा घेतला पाहिजे. गोव्यात ज्योती व गोवा धान (करजत) याचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जाते.
मात्र, यंदा काळ्या तांदळाचे उत्पादन जास्त घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. त्यामुळे आता किती हेक्टर क्षेत्र या लागवडीखाली येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हे बियाणे अजून गोव्यातील विविध कृषी कार्यालयांत उपलब्ध झालेले नाही. गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिक तत्त्वावर काळ्या तांदळाची शेती केली होती.
त्यामुळे यंदा हे उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लवकरच वाळपई कृषी कार्यालयात याचे बियाणे उपलब्ध होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाची संपर्क साधावा.
- विश्वनाथ गावस, वाळपई विभागीय कृषी अधिकारी
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.