अल्पा पै रायकर यांनी घडविल्या इको फ्रेंडली गणेशमूर्ती

Prachi Naik
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

जेव्हापासून मी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणावर होणाऱ्या वाईट प्रभावांबद्दल ऐकले तेव्हापासून याला काही अन्य पर्याय असू शकतो का याबद्दल मी सदैव विचार करायचे. त्यात काही वर्षांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीने मला कागदाच्या मूर्ती बनविण्यास मदत करण्यास सांगितले. माझ्यासाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी हा चांगला अनुभव होता. आता मला असे वाटते की मी तिला मदत करण्यापेक्षा तिनेच मला जास्त मदत केली, असे अल्पा पै रायकर यांनी सांगितले. त्या पेशाने आर्किटेक्ट असून गेल्या ५ वर्षांपासून त्यांनी शिल्पकला आणि कलाकृती घडविण्याची आपली आवड जोपासली आहे.

पणजी
जवळपास वर्षभरापूर्वी त्यांनी इको फ्रेंडली गणपती बनविण्यास सुरवात केली. हे गणपती बनविण्यात वापरली जाणारी सामग्री म्हणजे फक्त कागद आणि चिकणमाती असल्याने ते पर्यावरणास अत्यंत अनुकूल आहेत आणि कदाचित भविष्यात याची मागणी वाढेलही म्हणून त्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याचे ठरविल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्यासाठी हे एकदम नवीन असल्याने सुरवातीला हे गणपती घडविणे त्यांना कठीण वाटत होते, असे त्यांनी सांगितले.
कदाचित लोकांना कागदाच्या मूर्तींबद्दल जास्त माहिती नसल्याने सुरवातीला त्यांच्याजवळ फारच कमी ऑर्डर्स आल्या. परंतु सध्या त्यांच्याजवळ सुमारे २० मूर्ती बनविण्याच्या ऑर्डर्स असून त्यांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
लहानपणापासून हस्तकलेकडे कल असल्याने मूर्ती बनविण्याची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही त्या एकदम सुबक मूर्ती घडवतात. या मूर्तींबरोबरच त्या कागदाच्या कंदिलांसारख्या हस्तकलाही बनवतात. त्यांचे स्वतःचे हंसचित्र हे ऑनलाइन स्टोअर देखील आहे.
त्यांच्याजवळ मूर्तीच्या आकाराप्रमाणे १५०० ते ४५०० रुपयांपर्यंतच्या मूर्ती विक्रीस आहेत. त्यांना आवश्यक असलेला सर्व कच्चा माल त्या एका मित्राकडून विकत घेत असल्याचे त्यांनी सांगितले. मूर्तींसाठी त्या वेगवेगळ्या प्रकारचे आणि पोताचे कागद वापरतात. त्यासोबत त्या ‘रेवा’ या चिकणमातीचा वापर करतात. ‘रेवा’ चिकणमातीचा एक विशेष वाण असून ही लाल माती फक्त कोकणच्या किनारपट्टी भागात उपलब्ध असते.
एक मूर्ती घडविण्यासाठी किती वेळ लागेल हे मूर्तीच्या आकारावर अवलंबून असते. एका साच्यात चिकणमाती आणि कागद एकत्र ठेवणे हे एक कंटाळवाणे आणि वेळखावू काम आहे आणि हे करतेवेळी साचे स्थिर आणि टणक रहावे लागतात. एका पायाच्या सरासरी आकाराची मूर्ती घडविण्यासाठी साधारणतः ४ दिवस लागतात, असे त्यांनी सांगितले.
या मूर्ती बाजारात असलेल्या इतर मूर्तींपेक्षा वेगळ्या आहेत. कारण या मूर्ती घडविताना कोणतीही घातक रसायने वापरली जात नाहीत. कागद, चिकणमाती यासारखे बहुतेक साहित्य पर्यावरणास अनुकूल असते. गणपती विसर्जनानंतर ही माती झाडे वाढण्यास वापरली जाऊ शकते. या मूर्ती घडवताना जिथे शक्य असेल तेथे हळदीसारख्या इको-फ्रेंडली वस्तुंद्वारे रंगकामही केले जाते. बाजारात उपलब्ध असलेल्या रंगांचा अगदी कमी वापर केला जातो. उदाहरणार्थ फक्त मूर्तींचे डोळे रंगविण्यासाठी रंगांचा वापर केला जातो, असे त्या म्हणाल्या.
कोणतीही नविन संकल्पना रुजू होण्यात आणि लोकांनी ती स्वीकारण्यास वेळ लागतो. त्यामुळे इको फ्रेंडली गणपती मूर्तींची संकल्पना लोकांच्या पसंतीस उतरायला वेळ लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या