पर्यटन हंगामात दक्षिण गोव्यात फक्त ४० टक्केच शॅक सुरू

दैनिक गोमन्तक
रविवार, 6 डिसेंबर 2020

कोरोना स्थितीचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांना बसलेला असून यंदाच्या पर्यटन हंगामात दक्षिण गोव्यात फक्त ४० टक्केच शॅक सुरू करण्यात आलेले आहेत.

सासष्टी: कोरोना स्थितीचा सर्वाधिक फटका पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांना बसलेला असून यंदाच्या पर्यटन हंगामात दक्षिण गोव्यात फक्त ४० टक्केच शॅक सुरू करण्यात आलेले आहेत. कोरोनामुळे काही शॅकमालकांची आर्थिक स्थिती कमकुवत बनलेली असून काही शॅकमध्ये काम करणारे कर्मचारी गोव्यात न परतल्याने तसेच काही शॅकमालकांना कोरोनामुळे पर्यटक येणार नसल्याची भीती सतावत असल्याने अद्याप शॅक सुरू केलेले नाही, अशी माहिती गोवा शॅकमालक कल्याण सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी दिली.

गेल्या वर्षी उशिरा सुरु झालेला पर्यटन व्यवसाय कोरोनामुळे मार्च महिन्यातच संकटात पडला होता. कोरोनामुळे सर्व शॅकमालकांनी मार्च अखेरपर्यंत सर्व शॅक हटविली होती. दक्षिण गोव्यात दरवर्षी १०० च्या आसपास शॅक सुरू करण्यात 
येत होते, पण यंदा फक्त ४० शॅक सुरू करण्यात आलेले आहेत, असे क्रुझ कार्दोझ यांनी सांगितले. 

पर्यटन व्यवसाय गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झाल्याने आधीच शॅकमालक तसेच पर्यटन व्यवसायावर निर्भर असलेल्या व्यक्तींना फटका बसला होता. तीन महिन्यात शॅकमालकांना जो नफा मिळाला होता तो शॅकमध्ये काम करणाऱ्या परराज्यातील  कामगारांना निवारा आणि जेवण्याची सोय पुरविण्यास खर्च झाला होता.

परदेशी पर्यटकांची संख्या रोडावली
दिवाळीनंतर दक्षिण गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या काही प्रमाणात वाढलेली असून ख्रिसमस तसेच नववर्षाला पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. यंदाच्या पर्यटन हंगामाला विदेशी पर्यटकांच्या तुलनेत देशी पर्यटक जास्त प्रमाणात दिसून आले. गेल्यावर्षीचा  ज्या विदेशी पर्यटकांकडे विझा होता त्यातील काही प्रमाणात पर्यटकच गोव्यात आलेले दिसून येत असून यंदाच्या हंगामात गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या ६० टक्क्यांनी कमी झाली आहे, अशी माहिती गोवा शॅकमालक कल्याण सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्दोझ यांनी दिली.

आणखी वाचा:

काणकोण मामलेदार कार्यालयातर्फे मतदार जागृती फेरी -

गोव्यातील जिल्हा पंचायतींसाठी डिसेंबरला मतदान -

संबंधित बातम्या