‘त्या’ पार्ट्यांना पैसा कुठून येतो? ईडीने चौकशी करावी: नाईक

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

दत्तप्रसाद नाईक म्हणाले, पैसे दुबईतून येतात की दुबईला जातात याची चौकशी झाली पाहिजे. कपिल झवेरी व सह संशयिताच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स सार्वजनिक केले जावे. त्यातून त्यांचे कोणाशी संबंध आहेत हे जनतेला समजेल. भाजपच्या नेत्यांकडे बोटे दाखवून आपण नामानिराळे काही जणांना राहता येणार नाही. 

पणजी: अमली पदार्थांचा वापर होणाऱ्या पार्ट्यांचे आयोजन कसे केले जाते. त्यात कुठून पैसा येतो व पैसा जातो कुठे याची चौकशी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) करावी, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली.

ते म्हणाले, मुख्यमंत्री अमली पदार्थ व्यवहाराची पाळेमुळे राज्यातून खणून काढण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यांनी कारवाईस मोकळीक दिल्यानेच हणजुण येथे छापा पडू शकला आणि भले भले त्यात गजाआड होऊ शकले आहेत. मुख्यमंत्र्यांचा पूर्ण पाठिंबा या कारवाईस आहे. २००५ ते २०१२ पर्यंत कॉंग्रेसच्या राजवटीत असे छापे का पडत नव्हते. मुख्यमंत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी पर्यटन खाते, पोलिस खाते आणि संबंधित घटकांची बैठक घेतली होती त्या बैठकीत अमली पदार्थ व्यवहारांचे समूळ उच्चाटन झाले पाहिजे असे सांगितले होते. 

ते म्हणाले, पैसे दुबईतून येतात की दुबईला जातात याची चौकशी झाली पाहिजे. कपिल झवेरी व सह संशयिताच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स सार्वजनिक केले जावे. त्यातून त्यांचे कोणाशी संबंध आहेत हे जनतेला समजेल. भाजपच्या नेत्यांकडे बोटे दाखवून आपण नामानिराळे काही जणांना राहता येणार नाही. 

पर्वरीचा पाब्लो एक्सोबार कोण हे आता सर्वांना समजले आहे. रेव्ह पार्टी प्रकरणी अटक झालेल्या कपिल झवेरी याच्यासोबत अटक झालेल्याचे संबंध कोणत्या अपक्ष आमदाराकडे आणि कोणत्या प्रादेशिक पक्षाशी आहेत ही माहितीही एव्हाना तमाम गोमंतकीयांना झाली आहे. छायाचित्रे झळकावून काहीच होणार नाही. त्यातून अमली पदार्थांचा मुख्य मुद्दा बाजूला पडतो.

यावेळी पर्वरीच्या भाजप मंडळ अध्यक्ष कुंदा चोडणकर आणि राज्य कार्यकारीणी सदस्य रुपेश कामत उपस्थित होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या