कामगार शक्तीच्या एकजुटीचा प्रभाव..! 

Baburao Revankar
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

कामगार शक्तीच्या एकजुटीचा प्रभाव पालिका प्रशासनावर पडताच पालिकेने नमते घेऊन संपावर गेलेल्या कामगारांचा पगार आज (बुधवारी) वितरीत केला. सर्व कामगारांचे जुलै महिन्याचे वेतन दिल्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून कामगार कामावर रुजू झाले.

मुरगाव
कामगार शक्तीच्या एकजुटीचा प्रभाव पालिका प्रशासनावर पडताच पालिकेने नमते घेऊन संपावर गेलेल्या कामगारांचा पगार आज (बुधवारी) वितरीत केला. सर्व कामगारांचे जुलै महिन्याचे वेतन दिल्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून कामगार कामावर रुजू झाले. परंतु जर ऑगस्ट महिन्याचे वेतन ३१ ऑगस्टपर्यंत देण्यास दिरंगाई केल्यास ३ सप्टेंबरपासून पुन्हा संपावर जाण्याचा इशारा कामगारांनी पालिका अधिकाऱ्यांना दिला आहे. 
मुरगाव पालिकेचे कामगार वेतन मिळाले नाही म्हणून सोमवारपासून (ता. १०) संपावर गेले होते. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांची गोची झाली होती. ‘तुमचे हक्काचे वेतन देऊ, संप पुकारू नका’, असे आवाहन मुख्याधिकारी अरविंद बुगडे यांनी कामगारांना केले होते. याबद्दल लेखी कळवावे, असा हट्ट कामगारांनी धरून संप मागे घेण्यास नकार दिला होता. ‘पहिले दाम, नंतरच काम’ असा पवित्रा कामगारांनी घेऊन वेतन घेतल्याशिवाय कामावर रुजू न होण्याचा निर्धार केला होता. आज (बुधवारी) दुपारपर्यंत सर्व कामगारांचे वेतन बॅंक खात्यात जमा झाल्यावर कामगार दोन वाजता आपापल्या विभागात रुजू झाले. 

पालिका क्षेत्रात विखुरला कचरा... 
अडीच दिवस पालिका कामगार संपावर गेल्याने पालिका क्षेत्रात सर्वत्र कचरा विखुरला होता. या साचलेल्या कचऱ्यावर मोकाट जनावरांच्या कळपांनी ताव मारल्याने सर्वत्र कचरा विखुरल्याचे दृश्य ठिकठिकाणी निर्माण झाले होते. हा संप लांबला असता तर परीस्थिती भयानक होणार हे ध्यानात घेऊन नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी धावपळ करून कामगारांच्या वेतनाची तरतूद केली. संपामुळे दैनंदिन साफसफाई झाली नाही. त्यामुळे सर्वत्र कचरा साचलेला आहे. त्याची उचल अतिरिक्त काम करून केली जाईल, असे आश्वासन कामगार नेत्यांनी दिले आहे. त्यानुसार साफसफाई विभागाचे जोमाने काम सर्व प्रभागात सुरू झाले आहे. 

पेन्शनधारकांचेही वेतन द्या ः केशव प्रभू 
पालिकेच्या नियमित आणि रोजंदारीवरील कामगारांचे जसे वेतन दिले तसेच निवृत्त कामगारांचे हक्काचे निवृत्ती वेतन द्यावे, अशी मागणी अखिल गोवा पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू यांनी केली आहे. पालिका कामगारांना वेतनासाठी संपावर जाण्याची वेळ येऊ देऊ नका, असे श्री. प्रभू यांनी मुरगाव पालिका मंडळ आणि अधिकाऱ्यांना सुनावले आहे. मुरगाव पालिकेने जुलै महिन्याचे कामगारांचे वेतन संप पुकारल्यामुळे दिले. मात्र, निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन अडविले आहे. तेही वितरीत करावे, अशी मागणी श्री. प्रभू यांनी केली आहे. सुमारे ३० निवृत्त कर्मचाऱ्यांना दरमहा पहिल्या आठवड्यात निवृत्ती वेतन मिळत होते. पण, या खेपेस ते मिळाले नाही. त्यामुळे निवृत्त कर्मचारी बरेच संतापले आहेत. या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी तसेच डीए दिलेला नाही. अनेकवेळा निवृत्त कर्मचाऱ्यांनी पालिका मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्षांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवूनसुद्धा त्यांना त्यांची हक्काची थकबाकी दिली जात सल्याबद्दल केशव प्रभू यांनी खंतही व्यक्त केली.

संपादन ः संदीप कांबळे

संबंधित बातम्या