प्रादेशिक पक्षांचे एकत्र येण्यासाठी प्रयत्न..!

Prashant shetye
गुरुवार, 6 ऑगस्ट 2020

भाजपच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावलेले कांदोळकर यांनी थिवीसह हळदोणे मतदारसंघातही राजकीय कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरु करून आपली राजकीय ताकद विस्तारत असल्याचे सूचित केले आहे. याच दरम्यान माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पूत्र उत्पल पर्रीकर, मगोचे ज्येष्ठ नेते सुदीन ढवळीकर यांच्याशी झालेल्या भेटीगाठीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.

=

मडगाव, आपली राजकीय ताकद विस्तारण्याच्या प्रयत्नात असलेले भाजपचे थिविचे माजी आमदार किरण कांदोळकर व गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची भेट राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण करणारी ठरली. गोव्यात प्रादेशिक पक्षांनाच पुढे भवितव्य असल्याने गोव्यातील प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन युती करावी या उद्देशाने ही भेट घेतल्याचे कांदोळकर यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावलेले कांदोळकर यांनी थिवीसह हळदोणे मतदारसंघातही राजकीय कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरु करून आपली राजकीय ताकद विस्तारत असल्याचे सूचित केले आहे. याच दरम्यान माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पूत्र उत्पल पर्रीकर, मगोचे ज्येष्ठ नेते सुदीन ढवळीकर यांच्याशी झालेल्या भेटीगाठीमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. मंगळवारी त्यांनी सरदेसाई यांची भेट घेऊन पुढील राजकीय वाटचालीबाबत आपण गंभीर असल्याचे संकेत त्यांनी दिले.
सरदेसाई यांच्या सोबत झालेल्या भेटीत प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याविषयी चर्चा केली. गोव्याची जनता पुढील काळात केवळ प्रादेशिक पक्षानाच महत्व देणार आहे, असे कांदोळकर यांनी सांगितले.
गोव्याचे हित केवळ प्रादेशिक पक्षच जपू शकतो अशी जनतेची भावना आहे. राष्ट्रीय पक्षाच्या रिंग मास्टरांच्या कारभाराला गोव्याची जनता कंटाळली आहे. हे रिंगमास्टर कोणत्याही विषयावर केंद्रीय नेत्यांकडे बोट दाखवतात, असे कांदोळकर यांनी सांगितले.
मी सुदिन ढवळीकर, सरदेसाई व इतर नेत्यांना भेटलो आहे. समविचारी नेते व पक्षांना एकत्र यावे अशी माझी धारणा आहे. आजी-माजी नेतेही यात सामील होणार आहे. प्रादेशिक पक्षांची युती व्हावी, यासाठी माझे प्रयत्न आहेत, असे कांदोळकर यांनी सांगितले.
कांदोळकर यांच्यासोबत झालेल्या भेटीत प्रादेशिक राजकारण पुढे कसे न्यावे यावर चर्चा झाली, असे सरदेसाई यांनी सांगितले. गोव्याचे भवितव्य प्रादेशिक पक्षच घडवू शकतात अशी कांदोळकर यांची धारणा आहे. हा विचार घेऊन ते काही नेत्यांना भेटत आहेत. मगोचे नेते सुदिन ढवळीकर व इतरांची त्यांनी भेट घेतली, तशीच माझीही भेट घेतली, असे सरदेसाई यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

फोटो फीचर