गोव्यात कोरोनाचे आठ रुग्ण

Dainik Gomantak
गुरुवार, 14 मे 2020

३ एप्रिलनंतर प्रथमत गोव्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

पणजी

गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या आठवर पोचली आहे. मुंबईच्या बंदरात २० एप्रिल रोजी उतरून १४दिवस अलगीकरण करुन राहिलेल्या खलाशास कोरोनाची लागण झाल्याचे आज सायंकाळी स्पष्ट झाले. मुंबईत ३० रोजी त्याला लागण झाली नसल्याने त्याला गोव्यात येण्यार परवानगी देण्यात आली होती. काल प्राथमिक चाचणीत कोरोनाची लागण झाल्याचे आढळलेल्या सातही जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आज दुसऱ्या चाचणीचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. ३ एप्रिलनंतर प्रथमत गोव्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

कोरोनामुक्त गोवा अशी जोरदार जाहिरातबाजी सुरु असतानाच हरीत विभागातील गोव्याला आज सकाळी जोरदार झटका बसला. बुधवारी सात कोरोना रुग्ण आढळले. प्राथमिक चाचणीत ते पॉझिटिव्‍ह आढळले असून त्‍यांचा व्‍हायरॉलॉजी चाचणी अहवाल आज गुरुवारी मिळाला आहे. व्हायरॉलॉजी चाचणीच्या अहवालानंतर ते रुग्ण कोरोनाबाधित आहेत स्पष्ट झाले आहे. त्या सातही रुग्णांना संस्थांतर्गत अलगीकरण केंद्रातून मडगावच्या कोविड इस्पितळात पाठवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.त्यानंतर सायंकाळी खलाशासही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली.

गोव्‍याबाहेरून आल्‍याचे उघड 
राज्‍यात सापडलेले कोरोनाबाधित सात रुग्‍ण पूर्णत: बरे झाले होते. 3 एप्रिलनंतर कोरोनाचा एकही रुग्‍ण सापडला नव्‍हता. त्‍यामुळे केंद्राकडून राज्‍यातील दोन्‍ही जिल्‍हे ‘ग्रीन झोन’मध्‍ये समाविष्‍ट झाले होते. आता राज्‍याबाहेरून आलेल्‍या सात जणांची चाचणी पॉझिटिव्‍ह आल्‍याने पुन्‍हा एकदा लोकांत घबराट पसरली 
आहे. या संशयित रुग्णांची तपासणी केली असता प्राथमिक चाचणी पॉझिटिव्‍ह आल्‍याने त्‍यांच्‍या लाळेचे नमुने तपासणीसाठी पुन्‍हा एकदा घेण्यात आले असून ते तपासणीसाठी व्‍हायरॉलॉजी लॅबमध्‍ये पाठविण्‍यात आले होते. त्‍यांचा अहवाल  आज सकाळी आल्यानंतर राज्याला अधिक सतर्क राहावे लागणार आहे, हे स्पष्ट झाले आहे.

फोंड्यात झाली चाचणी
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल सांगितले होते, की, पॉझिटिव्‍ह रुग्‍णांची चाचणी फोंडा उप जिल्हा रुग्णालयात करण्यात आली होती. तेथे चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर लगेचच काळजी घेत त्यांचे अलगीकरण करण्यात आले. या रुग्णांचा जर व्‍हायरॉलॉजी लॅबमध्‍ये चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर त्यांना ‘कोविड’ इस्पितळात हलविण्यात येणार आहे. तज्‍ज्ञ डॉक्‍टर त्‍यांच्‍यावर देखरेख ठेवून आहेत.
या प्रकारामुळे राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित रुग्ण सापडल्याची माहिती माध्यमांना मिळताच सोशल मीडियावर अपडेट झळकत होते. त्‍यानंतर लोकांमध्‍ये खळबळ उडाली. आरोग्य खात्याने रात्री उशिरापर्यंत याबाबतची अधिकृत माहिती उघड केली नव्‍हती. त्‍यानंतर रात्री उशिरा सात जणांची पहिली चाचणी पॉझिटिव्‍ह आली असून, त्‍यांची व्‍हायरॉलॉजी चाचणी घेतली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही याबाबत दुजोरा दिला. आज सकाळी मात्र सात रुग्ण सापडल्यावर माहितगार सुत्रांनी शिक्कामोर्तब केले.
दरम्‍यान, कोरोना संशयित रुग्णांसाठीच्या वॉर्डमध्ये झालेल्या महिलेच्‍या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांनी मृतदेह स्‍वीकारण्‍यास नकार दिल्‍याची माहिती मिळाली आहे. तिच्या कोरोनाविषयीच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या.  त्‍या महिलेवर सांतिनेज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासंबंधीची नोंद पालिका प्रशासनाने केली आहे. 

काय करता येईल..?
राज्यातील टाळेबंदी पुन्हा कडक करणे आवश्यक आहे. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई होणे अपेक्षित आहे. राज्यात योग्य सामाजिक अंतराचे ‘तीन तेरा वाजले’ होते. त्यावर आता नियंत्रण आणणे आवश्यक आहे. कोरोना संशयितांच्या मृत्यूमुळे खळबळ निर्माण होत असून प्रशासनाने पूर्ण पारदर्शक असणे गरजेचे 
आहे. 

संबंधित बातम्या