१२ डिसेंबरला निवडणूक घेण्याचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाने गोवा सरकारला दिला

Election Commissions proposal to the goa government Review of pre preparation meeting counting of votes on 14th
Election Commissions proposal to the goa government Review of pre preparation meeting counting of votes on 14th

पणजी : ‘कोविड - १९’च्या पार्श्‍वभूमीवर बेमुदत स्थगित ठेवण्यात आलेली जिल्हा पंचायत निवडणूक शनिवार १२ डिसेंबरला घेण्याचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठीच्या पूर्व तयारीसंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर आज गोवा सरकारला दिला. सरकार याबाबत निर्णय घेणार आहे. त्यामुळे ही निवडणूक १२ डिसेंबरला व त्याची मतमोजणी १४ डिसेंबरला होऊ शकते. निवडणूक तारीख सरकारने अधिसूचित केल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होणार आहे. 

दरम्यान, जिल्हा पंचायत निवडणूक घेण्यासाठी पूर्व तयारीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक, निवडणूक निरीक्षक, निवडणूक अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांची आज बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीसाठी आवश्‍यक असलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांच्या सेवेसाठी योग्य आखणी करण्याबाबतही माहिती आयुक्तांनी जाणून घेतली व काही सूचना केल्या. या बैठकीनंतर निवडणूक आयुक्तांनी जिल्हा पंचायत निवडणूक १२ डिसेंबर २०२० रोजी घेण्याचा प्रस्ताव सरकारला पाठविला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी यंत्रणा येत्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या कामाला लागणार आहे. या निवडणुकीसाठीचे मतदान मतपत्रिकेद्वारे होणार आहे. त्यासाठीची तयारी यापूर्वीच झालेली आहे. 


जिल्हा पंचायत निवडणूक २२ मार्च २०२० रोजी जाहीर झाली होती व त्या दृष्टीने सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन आचारसंहिताही लागू झाली होती. मात्र पंतप्रधानांनी ‘कोविड - १९’च्या पार्श्‍वभूमीवर २२ रोजी जनता कर्फ्यूची घोषणा केल्यानंतर ही निवडणूक २४ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र गोवा सरकारने कोविड महामारीमुळे ही निवडणूक बेमुदत स्थगित ठेवण्याचा आदेश काढला होता. आता या स्थगिती आदेशाला नऊ महिने उलटून गेले आहेत व नव्याने निवडणूक घेण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. सरकारला व राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावण्यात आल्याने घाईघाईने ही निवडणूक घेण्यासाठी सरकारी व आयोगाने हालचाली जोरात केल्या आहेत. या निवडणुकीसाठी १५ खर्च निरीक्षक व १५ सर्वसाधारण निरिक्षक असतील. प्रत्येकी उत्तरेत ६ तर दक्षिणेत ९ जण असतील. याव्यतिरिक्त प्रत्येकी १५ निवडणूक अधिकारी व सहाय्य निवडणूक अधिकारी असतील त्यामध्ये प्रत्येकी उत्तरेत ६ व दक्षिणेत ९ जण असतील. 

४८ मतदारसंघात पुन्‍हा प्रचाराला वेग
राज्‍य निवडणूक आयोगाने १२ डिसेंबरला निवडणूक घेण्‍याचा प्रस्‍ताव सरकारकडे दिला आहे. त्‍यामुळे जिल्‍हा पंचायत निवडणूक प्रचाराला पुन्‍हा वेग येणार आहे. ५० पैकी ४८ मतदारसंघातच होणार आहे. सांकवाळ मतदारसंघ हा महिलांसाठी राखीव होता त्यामध्ये एक उमेदवारी अर्ज आल्याने बिनविरोध निवड झाली आहे. नावेली मतदारसंघातील एका उमेदवाराचे निधन झाल्याने ही निवडणूक स्थगित झाली आहे. त्यामुळे उत्तरेतील २५ तर दक्षिणेतील २३ मतदारसंघात उमेदवारांमध्ये चुरस होणार आहे. निवडणुकीसाठी १२१० मतदान केंद्रे ११८७ असून त्यातील ६४१ उत्तरेत तर दक्षिणेत ५४६ केंद्रांचा समावेश आहे. एकूण २०० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यातील उत्तरेत १०४ तर दक्षिणेत ९६ जणांचा समावेश आहे. एकूण ५० मतदारसंघापैकी ३० मतदारसंघात आरक्षण आहे तर २० मतदारसंघ सर्वसाधारण आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये २५ पैकी प्रत्येकी १५ मतदारसंघ आरक्षित आहेत. 


४८ जिल्हा पंचायतीमध्ये मतदारांची संख्या ७ लाख ९१ हजार ८२४ असून त्यात पुरुष ३ लाख ९२ हजार ५०१ तर महिला ३ लाख ९९ हजार ३१३ आहेत. उत्तरेत सर्वाधिक मतदार सुकूर मतदारसंघामध्ये (२२,५०५), सर्वाधिक उमेदवार चिंबल मतदारसंघात (८) व सर्वात कमी मतदार पाळे मतदारसंघात (१४.२०२) आहेत तर दक्षिणेमध्ये सर्वात कमी मतदार उसगाव - गांजे मतदारसंघात ( ११३४४), सर्वाधिक मतदार बाणावली मतदारसंघात (१९,९३१) तसेच सर्वाधिक प्रत्येकी ७  उमेदवार बोरी, रिवण व खोला या मतदारसंघात आहेत. उत्तरेत ताळगाव मतदारसंघात २ तर चिंबल मतदारसंघात ४ मिळून एकूण ६ मतदान केंद्रे तर दक्षिणेत कुर्टी मतदारसंघात १, दवर्ली मतदारसंघात ३ मिळून ४ मतदान केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com