विद्याभारती शैक्षणिक संघटनेच्या नवीन कार्यकारी समितीची निवड

वार्ताहर
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

विद्याभारती, गोवा या शैक्षणिक संघटनेची सर्वसाधारण सभा काल पर्वरी विवेकानंद सभागृहात घेण्यात येऊन २०२० ते २०२३ या तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारी समितीची निवड करण्यात आली

पर्वरी: विद्याभारती, गोवा या शैक्षणिक संघटनेची सर्वसाधारण सभा काल पर्वरी विवेकानंद सभागृहात घेण्यात येऊन २०२० ते २०२३ या तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारी समितीची निवड करण्यात आली. डॉ. सीताराम कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या कार्यकारी समितीवर पुढिलप्रमाणे सदस्यांचा समावेष आहे - कार्याध्यक्ष - प्राचार्य गजानन ह. मांद्रेकर, उपाध्यक्ष - प्राचार्य अनिल सामंत, संघटनमंत्री - पुरुषोत्तम पां. कामत, कार्यवाह - मुख्याध्यापक म्हाळसाकांत देशपांडे, सहकार्यवाह - प्रा. मनोहर पेडणेकर, कोषाध्यक्ष - राजेंद्र भोबे, सदस्य - प्राचार्य ज्ञानेश्वर पुं. पेडणेकर, प्रा. माधव जोशी, मुख्याध्यापक शिवाजी पाटील व प्राचार्य सुभाष भा. वेलिंगकर. राज्य शिशुवाटिका/शिशुशिक्षण प्रमुख म्हणून अॅड. रोशन अभय सामंत यांची निवड झाली. या सर्व निवडी एकमताने बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी सूर्यकांत ला. गावस यांनी घोषित केले.

सर्वसाधारण सभेचे स्वागत व प्रास्ताविक मावळते अध्यक्ष राजेंद्र भोबे यांनी केले. गत ३ वर्षांच्या कार्यकाळातील कामांचा व प्रगतीच्या टप्प्यांचा त्यांनी आढावा घेतला व नवीन समितीकडून अपेक्षा व्यक्त केल्या. गतवर्षाचा हिशेब व या वर्षाच्या अंदाजपत्रकाचा आराखडा त्यांनी सभेत मांडला. सूर्यकांत गावस यांनी निवडणूक अधिकारी व त्यांना सहाय्यक म्हणून मुख्याध्यापक संदीप पाळणी यांनी जबाबदारी पार पाडली. तत्पूर्वी प्राचार्य गजानन मांद्रेकर यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचले व एकमताने संमत करून घेतले. अॅड. रोशन सामंत यांनी शिशू शिक्षणाच्या प्रत्यक्ष कार्याची माहिती दिली.

प्राचार्य सुभाष भा. वेलिंगकर यांनी सरकारने मातृभाषा माध्यमाच्या, मराठी - कोकणी शाळांना दिले जाणारे विशेष उत्तेजनार्थ, दर विद्यार्थ्यामागे दरमहा ४०० रु. चे, लक्ष्मीकांत पार्सेकर सरकारने २०१७ साली सुरू केलेले अनुदान, सध्याच्या डॉ. प्रमोद सावंत सरकारने अकस्मात बंद करून मातृभाषा माध्यमाच्या मराठी-कोकणी शाळांवर गंभीर आघात केल्याचे सांगून विद्याभारतीने हे अनुदान चालू करण्यासाठी हिरीरीने प्रयत्न करावे लागतील, असे सांगितले. 

संबंधित बातम्या