काणकोण पालिका क्षेत्रात निवडणुकांसाठी गटबाजी सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

काणकोण पालिका क्षेत्रात पालिका निवडणुकीचा ज्वर चढू लागला आहे. त्याचप्रमाणे आताच गटबाजी सुरू झाली आहे. पालिकेत दहा वार्ड आहेत. सत्ताधारी पालिका गट बनवण्यासाठी किमान सहा नगरसेवकांची गरज आहे.

काणकोण :  काणकोण पालिका क्षेत्रात पालिका निवडणुकीचा ज्वर चढू लागला आहे. त्याचप्रमाणे आताच गटबाजी सुरू झाली आहे. पालिकेत दहा वार्ड आहेत. सत्ताधारी पालिका गट बनवण्यासाठी किमान सहा नगरसेवकांची गरज आहे. त्यासाठी या सत्ताधारी गटाचा सिकंदर बनण्यासाठी नगराध्यक्षपदावर डोळा ठेवून व्यूहरचना करण्यास काही माजी नगराध्यक्षानी सुरवात केली आहे. त्यात माजी नगराध्यक्ष समीर देसाई व रमाकांत नाईक गावकर आघाडीवर आहेत. त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपद भोगलेले व पालिका प्रशासनाचा दीर्घ अनुभव असलेले श्‍यामसुंदर नाईक देसाई आपल्या नेहमीच्या पणसुले वार्डातून निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. गेल्यावेळी नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव होते. यंदा ते राखीव नसल्याने पुरुष उमेदवारांनी नगराध्यक्षपदावर डोळा ठेवून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

गेल्या निवडणुकीत मास्तीमळ वार्डात निसटता पराभव स्वीकारलेल्या धिरज नाईक गावकर यांनी पुन्हा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्याशिवाय विद्यमान नगरसेवक किशोर शेट यांनी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यावेळी पालिका निवडणुकीत उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीने काही वार्डात त्यांनी विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. पालिका निवडणुकीत उपसभापती व माजी आमदार विजय पै खोत हे एकच उमेदवाराचे एकच पॅनेल उभे करण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या पालिका निवडणुकीत क्षत्रिय पागी समाजाचे तीन, कोमरपंत समाजाचे दोन व क्षत्रिय मराठा समाजाचे पाच नगरसेवक निवडून आले होते. महिलांसाठी नगराध्यक्षपद राखीव असल्याने महिला नगरसेवकांनी नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ वाटून घेतला.

कोरोना महामारीमुळे पालिकेच्या सक्रिय कार्याचे सुमारे आठ महिने वाया गेले आहेत. आता कुठेतरी पालिका क्षेत्रातील विकासकामांना गती येत आहे. याचवेळी पालिका मंडळाचा कार्यकाळ संपल्याने निवडणुका होईपर्यंत प्रशासक नेमण्यात आला आहे. कायद्यात पालिका मंडळाला मुदतवाढ देण्याची तरतूद आहे. तशी तरतूद असल्याने त्याचा वापर करून सरकारने पालिकेला मुदतवाढ देणे गरजेचे असल्याची काही नगरसेवकांची मागणी होती. पालिकेत दहा वार्ड आहेत. सर्वाधिक सुमारे १३५० मतदार पाटणे-कोळंब वार्डात आहेत. पणसुले वार्डात १२५० मतदार आहेत. चावडी, किंदळे हे कमी मतदार असलेले वार्ड आहेत. देवाबागचा भाग यापूर्वीच नगर्से वार्डाला जोडण्यात आला आहे. मास्तीमळ वार्डाच्या काही मतदारांचा समावेश गेल्या पालिका निवडणुकीत किंदळे वार्डात कमी मतदार असल्याने त्या वार्डात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत पालिकेतील वार्ड संख्या दहापेक्षा जास्त होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, वार्डाची रचना बदलणे शक्य आहे. त्यासाठी काही इच्छूक उमेदवारांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या पालिका निवडणुकीत चार गटांचे उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामध्ये उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी मंत्री रमेश तवडकर, माजी आमदार विजय पै खोत यांचे समर्थक रिंगणात उतरणार आहेत. हे सर्वच भाजपचे नेते असल्याने ते एका व्यासपीठावर येऊन सरळ लढतीला प्राधान्य देण्याची शक्यता नाकारता येत नाही. चौथा गट कॉंग्रेस समर्थकाचा राहण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीने काही इच्छूक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करण्यास आरंभ केला आहे.

पालिका क्षेत्रातील विकासकामे
पालिकेच्या जुन्या इमारतीचा विस्तार व फेरबांधणी १० कोटी, पालिका क्षेत्रातील कचरा उचल करण्यासाठी दोन ट्रक, दोन रिक्षा व एक जेसीबी - ८.५२ लाख रुपये, उपर रिक्षा - घन व  ओला कचरा उचलण्यासाठी (सुडातर्फे) ६५ लाख रु., घरोघरी कचरा संकलन – तीन वर्षांत २.५ कोटी रु. पालिका क्षेत्रातील गटारांवर घालण्यासाठी आरसीसी स्लॅब    - २२ लाख रु., मासळी मार्केटसाठी सेप्टीक टँक - ३० लाख रु., धुमाणे कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा पाया उंचावणे - ४.५० लाख रु., पाळोळे येथील वाहनतळ येथे प्रसाधनगृहाची बांधणी - १.४८ कोटी रु., मासळी मार्केट प्रकल्प उभारणीसाठी - ३.५ कोटी रु., पालिका क्षेत्रात विकासकामे -  ८२ लाख रुपये. या विकासकामांपैकी काही कामे २६ कोटी रुपये खर्चून सुरू करण्यात आली असल्याचे नगराध्यक्ष नितू समीर देसाई यांनी सांगितले.

संबंधित बातम्या