पालिका मंडळाच्या निवडणूका येत्या तीन महिन्यांत होण्याची शक्यता

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

 पालिका मंडळाला आपल्या कालावधीत झालेल्या प्रकल्पाचे उद्‌घाटन व्हावे, असे वाटणे साहजिक आहे. जी काही शिल्लक कामे राहिली आहेत, ती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोलून चौदाव्या वित्त अयोगाच्या निधीतून पूर्ण करूया. आता पालिकावर प्रशासक नियुक्त होणार असल्याने शिल्लक कामे त्यांच्याकडून करून घ्यावी. पालिका मंडळाचा कार्यकाल संपल्याने निवडणूक तीन महिन्यांत कधीही होऊ शकतात

 सांगे : पालिका मंडळाला आपल्या कालावधीत झालेल्या प्रकल्पाचे उद्‌घाटन व्हावे, असे वाटणे साहजिक आहे. जी काही शिल्लक कामे राहिली आहेत, ती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी बोलून चौदाव्या वित्त अयोगाच्या निधीतून पूर्ण करूया. आता पालिकावर प्रशासक नियुक्त होणार असल्याने शिल्लक कामे त्यांच्याकडून करून घ्यावी. पालिका मंडळाचा कार्यकाल संपल्याने निवडणूक तीन महिन्यांत कधीही होऊ शकतात म्हणून तुम्ही तुमच्या कामाला लागा, असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी 
केले.

सांगे नगरपालिकेने सुवर्ण महोत्सव निधीतून एक कोटी तेवीस लाख खर्चून बांधलेल्या पालिका विश्रामगृहचे उद्‌घाटन केल्यानंतर उपमुख्यमंत्री कवळेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष केरोज क्रूझ, पालिकाधिकारी मनोज कोरगावकर, अभियंता सुहास फळदेसाई व सर्व नगरसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमाला पालिकामंत्री मिलिंद नाईक, वीजमंत्री निलेश काब्राल, पालिका संचालक डॉ. तारिक थॉमस यांनी येणे टाळले. यात सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी आपल्याला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कार्यक्रमात सहभागी न होता आपल्या समर्थकासमवेत निघून गेले. 

मंत्री कवळेकर म्हणाले, संजीवनी बंद करणार, असे सरकारने कधीच म्हटले नाही. सध्या बंद असला तरी पुढे तो कशा पद्धतीने सुरू करणार हे अजून नक्की केले नाही. काही चुका असल्यास दाखवून द्या. पण, वेगवेगळ्या समिती, सभा घेऊन राजकारण करून वातावरण तापवू नका असे स्पष्ट करीत उद्या समितीची बैठक होणार आहे, त्यात निर्णय होणार आहे. तोडणीविना शिल्लक राहिलेल्या ऊस उत्पादकांना महामारी असतानाही ८० लाख लाख रुपये वितरण करण्यात आले आहे. आंदोलन करण्यापेक्षा सरकार चर्चा करून समस्या सोडविण्यासाठी नेहमीच तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्ष केरोज क्रूज यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, विद्यमान पालिका मंडळाची मुदत संपत आल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सहमती घेऊन विश्रामगृह उद्‌घाटन करण्याचा निर्णय घेतला आहे.  यात ज्या अपुऱ्या सुविधा आहे, त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन मुध्यमंत्री सावंत यांनी दिले आहे. उद्‌घाटन फलकावर माजी आमदाराचे नाव घालण्याची सूचना पालिका मंडळाने केली असल्याचे स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिले. नगरसेवक संजय रायकर, संदेश कोसंबे, रुमाल्डो फर्नांडिस, कायतान फर्नांडिस यांनी आपले विचार मांडले. पालिकाधिकारी मनोज कोरगावकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या