विजेवरील दुचाकी घेतल्‍यास १५ हजारचा लाभ: ऊर्जामंत्री नीलेश काब्राल

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

हरित गोवा प्रकल्पांतर्गत विजेवरील वाहने वापर योजनेत ही तरतूद केली जाणार आहे. अपारंपरिक ऊर्जामंत्री नीलेश काब्राल यांनी ही सूचना केली आहे.

पणजी: विजेवरील वाहने (बॅटरीवर चालणारी) वापरण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोलवरील दुचाकीची नोंदणी रद्द करून विजेवर चालणारी नवी दुचाकी घेणाऱ्यास १५ हजार रुपये प्रोत्साहनपर द्यावेत, अशी तरतूद सरकार करत आहे. हरित गोवा प्रकल्पांतर्गत विजेवरील वाहने वापर योजनेत ही तरतूद केली जाणार आहे. अपारंपरिक ऊर्जामंत्री नीलेश काब्राल यांनी ही सूचना केली आहे.

गोवा ऊर्जा विकास यंत्रणेच्या माध्यमातून हे धोरण लागू केले जाणार आहे. या धोरणाची गेले वर्षभर अंमलबजावणी झाली नसल्याचे वृत्त आज ‘गोमन्तक’ने दिल्यानंतर काब्राल यांनी त्याची दखल घेतली. त्यांनी येत्या महिनाभरात हे धोरण नक्की करा, असे अधिकाऱ्यांना सांगितले आहे. यंत्रणेच्या बैठकीत या धोरणावर शिक्कामोर्तब झाल्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ते सादर केले जाणार आहे. त्यानंतर ते अधिसूचित केले जाणार आहे.

कच्चा मसुदा लवकरच निश्‍चित
विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक लाभाची तरतूदही या धोरणात केली जाणार आहे. हा नवा व्‍यवसाय असेल. येत्या आठवडाभरात या धोरणाचा कच्चा मसुदा नक्की केला जाणार आहे. त्याशिवाय विजेवरील वाहनांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी काही ब्रॅण्ड ॲम्बासेडर नेमण्याचाही विचार सुरू आहे. सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या घर मालकांना अलीकडेच गोवा ऊर्जा विकास यंत्रणेच्या माध्यमातून अनुदानाचे वाटप करण्यात आले. त्यावेळी अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या गरजेवर भाष्य करण्यात आले होते. केंद्र सरकारने तशी सूचना राज्य सरकारला केली आहे.

यासाठी पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याचे ठरवण्यात आले आहे. राज्यात दुचाकींचे प्रमाण मोठे असल्याने प्रथम विजेवरील दुचाक्या लोकांनी घ्याव्यात, यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यासाठी जुन्या दुचाकीची नोंदणी रद्द करून विजेवरील दुचाकी घेणाऱ्यास थेट आर्थिक लाभाची तरतूद केली जाणार आहे.

  • पेट्रोलवरील दुचाकीची नोंदणी रद्द केल्‍यास मिळेल लाभ
  • विजेवरील वाहनांसाठी विविध ठिकाणी चार्जिंग स्‍टेशन्स
  • वाहनांचा प्रसार, प्रचारासाठी ब्रँड अॅम्‍बासेडर
  • सौर ऊर्जा निर्मितीकर्त्यांना अनुदान वाटप

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या