भाडे करार नाही म्हणून वीज बिल हि नाही

भाडे करार नाही म्हणून वीज बिल हि नाही

पणजी : येथील मार्केट इमारतीतील दुकानदारांशी करावयाचा भाडेकराराला विलंब होत असून, दुसऱ्या बाजूने इमारतीचे वीज बिल वाढत आहे. भाडेकराराचे नेमके घोडे कोठे आडले आहे, हे नक्की समजून येत नाही. एका बाजूला मसूदा तयार आहे, फक्त सर्वांचे सह्या घ्यायच्या बाकी आहेत, असे सांगितले जात असले तरी अजून बरेच पाणी पुलाखालून वाहून जाणे बाकी आहे, असेच आत्तापर्यंत होत असलेल्या विलंबावरून दिसून येते.

जेव्हापासून गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाने मार्केट इमारत उभारली, तेव्हापासून स्थलांतर झालेले दुकानदारांचा भाडेकरार होऊ शकला नाही. महापालिकेच्या ताब्यात ही इमारत आल्यानंतर तत्काळ भाडेकरार होतील, असे वाटत होते. परंतु इमारतीतील अनेक दुकानांचे मालक असलेले नगरसेवक म्युन्सिपालटी टेंट असोसिएशनला फूस लावत असल्याने करार लांबवणीवर पडत असल्याची चर्चा आहे.

अनेकांना करार होईल तेव्हापासून भाडे आकारावे असे वाटत आहे. परंतु महापालिका आपल्या निर्णयावर ठाम असून, मागील भाडेपट्टीची रक्कम काही टप्प्यांत भरण्यास मुदत देण्याच्या तयारीत आहे. कदाचित नव्या मसुद्यात याचा समावेशही असू शकतो. आयुक्त संजित रॉड्रिग्स करार करण्यासाठी आक्रमक आहेत, करार झाल्यास येणाऱ्या महसुलातून थकीत वीज बिलाची रक्कम भरता येऊ शकते, असे त्यांना वाटते. तर दुसरीकडे चार कोटींवर गेलेली विजेची रक्कम वाढत असून, तोही चिंतेचा भाग आहे. त्यामुळे करार जेवढा लांबेल तेवढी डोकेदुखी अधिक वाढणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, याविषयी भाडेकराराविषयी विचारणा केली असता महापौर उदय मडकईकर म्हणाले की, मसुदा तयार झालेला आहे. करार करण्यास आचारसंहितेची त्यात काही अडचण येणार नाही. परंतु आणखी पंधरा दिवस थांबावे लागेल, असे दिसते. परंतु दुकानदारांची संघटना करार करण्यास राजी झाली असून, त्याविषयी आणखी एखादी बैठक काही दिवसांत घेतली जाईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com