चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे ठरला मुलाखतीस पात्र

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

प्रश्नपत्रिकेतील या चुकीमुळे एका उमेदवारास मात्र सहायक कृषी अधिकारी पदाच्या मुलाखतीस पात्र ठरता आले आहे. या चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे दोन गुणांची झालेली वाढ त्याच्या पथ्यावर अशी पडली आहे.

पणजी : गोवा लोकसेवा आयोग कोणतीही पदे भरण्यासाठी संगणकावर आधारीत परीक्षा घेते आणि परीक्षा झाल्यावर तासाभरातच निकाल जाहीर करते. यात मानवी हस्तक्षेपास जराही वाव नसतो. मात्र, मानवी चूक ही कोणत्याही पातळीवर होऊ शकते. प्रश्नपत्रिकेतील या चुकीमुळे एका उमेदवारास मात्र सहायक कृषी अधिकारी पदाच्या मुलाखतीस पात्र ठरता आले आहे. या चुकीच्या प्रश्नपत्रिकेमुळे दोन गुणांची झालेली वाढ त्याच्या पथ्यावर अशी पडली आहे.

याबाबत आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल नरोन्हा यांनी सांगितले की, आयोग संगणकावर आधारीत परीक्षा घेत असला तरी त्यासाठी प्रश्नपत्रिका कोणीतरी काढावी लागते. परीक्षा झाल्यावर दुसऱ्या दिवशी प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाते. एकतर प्रश्न चुकीचा असू शकतो किंवा प्रश्नाच्या उत्तरादाखल दिलेले चारही पर्याय चुकीचे असू शकतात किंवा दोन पर्याय बरोबर असू शकतात किंवा चारही पर्याय बरोबर असू शकतात. यामुळे उमेदवाराने दिलेले उत्तर चूक की बरोबर हे ठरवण्यात संगणकाकडून गल्लत होऊ शकते. कारण, प्रश्नपत्रिका काढणाऱ्याने बरोबर म्हणून दिलेले उत्तरच संगणकच विचारात घेतो. 

या परिस्थितीत उमेदवारास दाद मागण्याची व्‍यवस्था आयोगात आहे. त्यानुसार प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध केल्यानंतर दोन दिवसांत संबंधित उमेदवाराने पुरेशा संदर्भासह प्रश्न किंवा उत्तर चुकीचे कसे आहे, याची लेखी माहिती आयोगाला सादर करायची असते असे सांगून ते म्हणाले, ही माहिती प्रश्नपत्रिका काढणाऱ्यास पाठवली जाते व खुलासा मागवला जातो. उमेदवाराचे म्हणणे ग्राह्य धरा किंवा ग्राह्य धरू नका (कारणे देणे आवश्यक) हे प्रश्नपत्रिका काढणाऱ्याने कळवल्यावर आयोग त्यानुसार गुण देऊन वा न देऊन सुधारीत निकाल तयार करतो व तो संकेतस्थळावर उपलब्ध करतो. अनेक परीक्षांनंतर असा सुधारीत निकाल उपलब्ध केला आहे हे संकेतस्थळावर दिसते.

आयोगाने परीक्षा घेतल्यावर दुसऱ्या दिवशी प्रश्नपत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध केली जाते. त्यात चूक असल्याचे उमेदवाराने लक्षात आणून दिल्यावर प्रश्नपत्रिका काढणाऱ्यास विचारले जाते. त्याने सांगितल्यानुसार उमेदवारास गुण दिले जातात किंवा दिलेही जात नाहीत. गेली ३ - ४ वर्षे प्रचलित अशी ही पद्धती आहे.
- जुझे मान्युएल नरोन्हा, 
अध्यक्ष, गोवा लोकसेवा आयोग

संबंधित बातम्या