भक्तिमार्ग व भजनातील भावदर्शन यांचा अनुबंध

भक्तिमार्ग व भजनातील भावदर्शन यांचा अनुबंध
भक्तिमार्ग व भजनातील भावदर्शन यांचा अनुबंध

श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन/पूजन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन या नऊ प्रकारांच्या भक्ती भागवतात सांगितलेल्या आहेत. या नऊ प्रकारांना ‘नवविधा भक्ती’ असे संबोधले जाते. या नऊ भक्तींपैकी एक असलेल्या ‘स्मरण’ या उपप्रकारात ‘भजन’ या कलेचा समावेश होतो. या स्मरणाअंतर्गत ‘विष्णु:स्मरणा’ला विशेष महत्त्व आहे. हे स्मरण गायनाद्वारेही करता येते. त्याअंतर्गत भजन करता येते अथवा अभंग म्हणून ईश्वराची आळवणी करता येते. भजनात शब्द, स्वर आणि ताल यांचा त्रिवेणी संगम साधला जातो.

भजनाच्या माध्यमातून ईश्वराची मनोभावे आळवणी करून गायन-वादन करून आपण ईश्वरापर्यंत पोहोचत असतो असे मानले जाते. एका परीने तो भाविक आर्ततेने देवाला प्रेमळ साद घालत असतो व त्याला स्वत:पाशी खेचून आणत असतो. म्हणूनच भजनाला ‘भक्तिमार्ग’ संबोधले जाते. भक्तिमार्ग हा विद्यमान कलियुगातील सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम आणि सर्वांत सुलभ-सोपा मार्ग असे मानले जाते. सुयोग्य भजन सादरीकरण करणारे भक्तिवंत ईश्वराशी अनुसंधान साधू शकतात. त्यांना त्याद्वारे अद्वितीय स्वरूपाची वेगळीच अनुभूती, वेगळाच आनंद प्राप्त होत असतो. अर्थात ब्रह्मानंद, परमानंद यांचे दान त्यांच्या ओंजळीत पडत असते. हल्ली ‘भक्तिमार्ग’ शब्दाऐवजी ‘भक्तियोग’ हा समांतर शब्दही यासंदर्भात विपुलतेने वापरला जातो.

आपल्यापैकी बहुतेक जण नेहमी देवाला नमस्कार करतो अथवा नित्यनेमाने, प्रसंगपरत्वे अथवा दरदिवशी स्तोत्रवाचन, श्लोकवाचन या माध्यमांतून देवाची पूजा-अर्चा, आराधना, उपासना करतो. हे सर्व भक्तीचे नानाविध प्रकार असले, तरी त्यापैकी भजन हा श्रेष्ठतम भक्तिप्रकार असल्याचे मानले जाते. तात्पर्य, भक्तिमार्गात भजनाला श्रेष्ठत्व आहे.

भजनरूपी सत्संगाला जाणे, नाम:स्मरण करणे, सत्कार्य करणे, ईशसेवेसाठी नेहमी तळमळ असणे, ईशसेवेच्या हेतूने काही गोष्टींचा त्याग करणे, परोपकारी वृत्ती बाळगणे इत्यादी गोष्टींना महत्त्व आहेच, पण त्या सर्वांबाबत दिखाऊ वृत्ती नसावी. त्या सर्व गोष्टी मन:पूर्वक कराव्यात आणि दैनंदिन जीवनात इतरांशी वागतानाही त्या कृतीत आणल्या पाहिजे. तेव्हाच ती खरी भक्तिभावना होईल. आपण चांगल्यापैकी भजनसेवा केली आणि समाजात लोकांशी व्यवहार करताना नेमके उलट वागलो, तर त्या भक्तीला काडीचेही महत्त्व नाही. ‘जशी उक्ती तशी कृती’ असली पाहिजे. मोठमोठ्याने भजने आळवण्याला काहीच अर्थ नाही. त्याच्या जोडीला मनाची प्रांजळ भावना हवी.

भजनातील स्वरांपेक्षा त्यातील भावना ईश्वराला प्रिय आहे. ‘देव भावाला भुकेला’ असे मानले जाते. ‘भाव तोची देव’ असेही म्हटले जाते. संतांनी म्हणूनच ठेवले आहे, की ‘भावेवीण भक्ती, भक्तीवीण मुक्ती, बळेवीण शक्ती बोलू नये’. त्याचप्रमाणे अन्य एका संतवचनात म्हटले आहे, की ‘भावेवीण भक्ती, अर्थावीण पोथी आणि नाकावीण मोती शोभत नाही.’ अर्थात नानाविध संतवचनांचा, म्हणी-वाक्‍प्रचारांचा सारांश ध्यानात ठेवून भजन कलाकारांनी सादरीकरणात भावनेला कमालीचे महत्त्व दिले पाहिजे. तो भाव त्यांच्या चेहऱ्यांवरून, त्यांच्या देहबोलीवरून दिसून यायला हवा. ‘मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव’ या काव्यपंक्तीचा भावार्थ लक्षात घेतल्यास या मुद्द्याचे महत्त्व आपल्या लक्षात येईल. ईश्वराचे तसेच संतमहंतांचे गुणगान भावनेविना केले तर ते सर्व काही व्यर्थच होय. दुसरे म्हणजे ती भावना विशुद्ध स्वरूपात असायला हवी. भाव-भावना शुद्ध असली तरच भक्ती सफल होते. शुद्ध भावनेमुळेच ईश्वरप्राप्ती होते आणि भक्ताचे मनोरथ पूर्ण होते, असे या भक्तिभावनेमागचे गुणतत्त्व आहे. स्वत: सद्‍भावनेने केलेली सेवा परमात्म्याच्या अर्थांत देवाच्या चरणी रुजू होण्यासाठी भजन कलाकारांनी हे भान पाळायलाच हवे. संत एकनाथांनीही ‘भाव तोचि देव’ हे तत्त्व सांगितलेले आहे.

सर्व कलाकारांनी भजनात नेहमी यथायोग्य भावदर्शन केल्यास तो भजन कार्यक्रम अधिक खुलतो. तथापि, त्याबाबत अतिशयोक्ती केली तर मात्र ते नुकसानकारकही ठरू शकते, याचेही भान ठेवणे गरजेचे आहे. तात्पर्य, कलाकाराच्या मुखकमलावर सकारात्मक भाव दिसायला हवे.

पुराणकालीन देव-दानवांच्या काळात दानवांनी भक्ती, तपाचरण करून देवाला प्रसन्न करून घेतले व त्यांच्याकडून वरही प्राप्त करून घेतले. त्या काळातील हिरण्यकश्यपू व लंकाधीश रावण यांच्यासारख्या दुष्ट प्रवृत्तींनी ग्रासलेल्या पुरुषांनी देवदैवतांकडून वरप्रसादाच्या माध्यमातून त्रैलोक्यातील ऐश्वर्यसुद्धा वराच्या माध्यमातून देवांकडून प्राप्त केले. परंतु, वर मागताना त्यांच्या मनात सद्‍भावना नव्हती. तर स्वार्थी, आपमतलबी तथा दुष्ट हेतू होता. त्यांच्या ठायी सद्‍भावना नसल्याने अखेरीस त्यांना कोणते फळ प्राप्त झाले, हे तर सर्वज्ञातच आहे. याउलट, त्यांच्यानंतरच्या काळातील संतश्रेष्ठ तुकाराममहाराज, ज्ञादेश्वरमाउली अशा संतमहंतांनी सद्‍भावनेने देवाची मनोभावे भक्ती-आराधना, उपासना करून त्याला प्रसन्न करून घेतले आणि त्यामुळेच त्यांना सद्‍गती प्राप्त झाली. आपण ज्या भावनेने मागत असतो, त्याच भावनेतून आपल्याला चांगले-वाईट फळ मिळत असते, हा तत्त्वविचार आपण समजून घ्यायला हवा.

माणसाचे चित्त एकाग्र करण्याचे फार मोठे सामर्थ्य भजनकलेत आहे. ही एकाग्रता आली की. मनही निर्विकार होते. चित्त्ताची एकाग्रता आणि मनाची निर्विकार स्थिती भजनात महत्त्वाची आहे. ईश्वराच्या नामस्मरणात रममाण झाल्यानंतर माणसाला स्वत:च्या इंद्रियांवरही ताबा मिळवणे शक्य होते. त्यामुळे चित्त शुद्ध ठेवून भजन केल्यास ते अधिक फलद्रूप होत असते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी स्वत:च्या एका अभंगात म्हटलेलेच आहे, ‘‘देह (चित्त) शुद्ध करुनी भजनी भजावें । आणिकांचे नाठवावे दोष गुण ।।’’ त्यामुळे, चित्त शुद्ध ठेवून आपण भजन केल्यास आपण ईश्वराशी चांगल्या प्रकारे मन:संवाद साधू शकतो.

साखरेची गोडी फक्त तिची चव घेणाऱ्यासच जशी कळते, तद्वत भजनाची खरी गोडी भक्तिभावाने देवाचे नामस्मरण करणाऱ्यालाच कळते. त्या सच्च्या कलाकाराला/भक्ताला सच्चिदानंदाची प्राप्ती होत असते. त्या परमानंदाचे, ब्रह्मानंदाचे वर्णनही करता येणे अशक्यच! म्हणूनच तर ते पुन्हा पुन्हा भजनसेवेत रमत असतात. त्या सेवेत ते तन्मयतेने वाहून घेत असतात; कारण, त्यांना त्याद्वारे पराकोटीची आनंदप्राप्ती होत असते.

ईश्वराशी तादात्मता साधण्यासाठी नानाविध पद्धतींनी संगीतातील स्वराविष्कार करणे अथवा तार सप्तकात मोठमाठ्याने गाणे याला महत्त्व नसून गाणाऱ्याच्या भावनेला सर्वाधिक महत्त्व आहे. पद्यातील/अभंगातील भावना, त्यातील शब्दांचा अर्थ नीट समजून न घेता स्वरांचे खेळ करण्याच्या उद्देशाने अक्षरांची व शब्दांची कशीही तोडमोड, जुळवाजुळव करणे हे भजनात अयोग्य आहे. तसे त्यांना करायचेच असल्यास त्यांच्यासाठी संगीताचे अन्य मार्ग खुले आहेत. त्यांनी त्यासाठी भजनाच्या वाट्याला जाऊच नये. कारण भजन हे एका दृष्टीने पवित्र प्रकारचे एक व्रतच आहे. तात्पर्य, भजनात संगीतापेक्षा भावनेला महत्त्व आहे. कलाकारांची आर्तता, प्रासादिकता, भावनाविष्कार इत्यादी बाबी सादरीकरणात दिसायला हव्या. एखाद्या श्लोकाचा अथवा अभंगाचा भावार्थ काय आहे, त्यात नेमके काय सांगितले आहे, हे जाणून न घेता केवळ संगीताचाच विचार करून गात बसणे हे पूर्णत: अयोग्यच आहे.

भाविकांना व लोकांना श्रवणानंद देण्याचा प्रयत्न भजन कलाकारांनी केला पाहिजे. भाविकजन ईश्वराशी अनुसंधान साधण्याच्या हेतूने भजन कार्यक्रमात रमत असतात, तर इतर सर्वसामान्य लोक कलानंद मिळावा या हेतूने भजन कार्यक्रम ऐकत असतात. अशा सर्वांना श्रवणानंद मिळवून देणे हे भजन कलाकाराचे कर्तव्यच ठरते. ईश्वरसेवा करणे, कलासेवा करणे, ईश्वराशी तादात्म्यता साधणे, आर्थिक स्वरूपातील मानधन प्राप्त करणे असे अनेक हेतू भजन कलाकारांचे असू शकतात. तथापि, हे सर्व करीत असताना स्वार्थातून परमार्थ साधण्याचाही प्रयत्न कलाकाराने करायला हवा.

व्यापारी विश्वात ग्राहकराजा महत्त्वाचा असतो, तर निवडणुकीत मतदारराजा महत्त्वाचा असतो. त्यासंदर्भात ग्राहक, मतदार इत्यादींना साक्षात देव असल्याचे मानले जाते. भजन क्षेत्रातही असेच आहे. भजनाचे सादरीकरण करणाऱ्या कलाकारांच्या दृष्टीने रसिकजनसुद्धा देवासमान असतात. तात्पर्य, भजनाचा मुख्य हेतू कलेचे सादरीकरण नाही. त्यामुळे केवळ कलेच्या दृष्टीकोनातून भजनाकडे पाहणे अयोग्य आहे. कारण भजन ही भक्तिरसप्रधान कला आहे. अर्थात भजनात कलेपेक्षा भक्तीला अधिक महत्त्व आहे.

भजनात श्लोकांपासून शेवटी भैरवी व आरती, उपसंहार इत्यादी प्रकारांचे सादरीकरण पद्धतशीरपणे कसे करावे, कोणता अभंग कधी गावा किंवा गाऊ नये, भजनाच्या परंपरेत कोणत्या बाबी अंतर्भूत आहेत या अनेकविध घटकांचे सजगतेने भान ठेवले, तर भजनात भक्तिरसाची निर्मिती होणे शक्य आहे. अर्थात भजनाच्या एकंदर मांडणीत शिस्त हवी. भजनातून भक्तिभाव दिसलाच पाहिजे. टाळवादन, पखवाजवादन, संवादिनीवादन आणि त्याच्याच जोडीला होणारा गायनाविष्कार एकमेकांना पूरक असला तरच भक्तिरसाचा आस्वाद रसिकांना घेता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com